Maharashtra Bandh: महाविकास आघाडीचा ‘बंद’चा ‘महा’फुसका बार – अमोल थोरात

एमपीसी न्यूज – राज्यातील महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारण्यात आले, मात्र व्यापारी व्यावसायिक व इतर सर्वच घटकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. पिंपरी-चिंचवड शहरात देखील या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे आंदोलन म्हणजे ‘महा’फुसका बार ठरले आहे, अशी टीका भाजपाचे पिंपरी- चिंचवड शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या आंदोलनावर अमोल थोरात यांनी टीका करून त्याबाबत प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात नमूद केले आहे की, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस यांच्यात समन्वय नसल्याचे सोमवारच्या आंदोलनातून दिसून आले. त्यामुळे या तीनही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उस्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाले नाहीत.

राजकीय दृष्टिकोनातून आंदोलनाचे आयोजन केले गेले. ही बाब शहरवासीयांच्या लक्षात आली. त्यामुळे शहरवासीयांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. ‘बंद’ची हाक दिली असतानाही शहरात सर्वत्र दुकाने व इतर व्यवसाय नेहमीसारखे सुरळीत सुरू होते.

यावरून महाविकास आघाडी सरकारवर सामान्यांचा विश्वास नसल्याचे दिसून येते. लोकांना रुचत नसलेले हे तीघाडी सरकार आहे. या सरकारमधील पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये देखील सातत्याने ‘बिघाडी’ होत असते. त्यामुळे लोकांनी आंदोलनाला प्रतिसाद दिला नाही. याबाबत संबंधित पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा उपरोधिक सल्ला देखील अमोल थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.