Pune Crime News : कोणताही पुरावा मागे नसताना पोलिसांनी शिताफीने मंगल गुप्ताच्या मारेकऱ्याला गाठलेच !

एमपीसी न्यूज – सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धायरीत गुरुवारी एका अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. खून केल्यानंतर कोणताही पुरावा मागे न सोडल्याने मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. परंतु सिंहगड रस्ता पोलिसांनी शिताफीने मारेकऱ्याचा माग काढला आणि अवघ्या 48 तासात आरोपीला अटक केली.

मंगल प्रसादसिंग गुप्ता असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर हा खून केल्याप्रकरणी शुभम भगवान पुयड (वय 25) याला पोलिसांनी अटक केली आहे. सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मंगल गुप्ता हा मागील पंचवीस वर्षापासून धायरी परिसरात राहत होता. मिळेल ते काम करून तो आपली उपजीविका भागवत असे. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर मिळेल त्या जागी झोपत होता. गुरुवारी डोक्यात दगड घालून त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. सुरूवातीला अनोळखी असणाऱ्या मंगल गुप्ता याच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. खून झालेल्या ठिकाणी आजूबाजूला चौकशी केली आणि मयत व्यक्तीची ओळख पटली. चौकशी दरम्यान पोलिसांना एका तरुणाविषयी माहिती मिळाली होती. खून झाल्याच्या दिवशी तो याच परिसरात संशयास्पदरीत्या फिरत होता असे स्थानिकांनी सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तो एका हॉटेलमध्ये कामाला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली असता दोन दिवसांपासून एक कामगार कामावर आला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवत खबर यांच्या मदतीने शुभम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने दिलेल्या माहितीनुसार शाब्दिक चकमक झाल्याने रागाच्या भरात त्याने मंगल गुप्तच्या डोक्यात दगड आणि वीट घालून त्याचा खून केल्याचे सांगितले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, सचिन माळवे, शंकर कुंभार, सुहास मोरे, विकास बांदल यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.