Alandi  News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रिक्षा चालकांचे प्रश्न समजावून घेतले

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी रिक्षा चालकांशी दिलखुलास गप्पा मारल्या. रिक्षा चालक संघटनांशी चर्चा करून रिक्षा चालकांचे प्रश्न समजावून घेतले.

पुणे आळंदी रोड येथे रिक्षा टेम्पो व छोट्या बांधवांसाठी पासिंग ट्रॅकचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता नियोजित होते. मात्र नियोजित वेळेआधी पवार सकाळी साडेआठलाच कार्यक्रमस्थळी हजर झाले. नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर आल्याने सर्वांचा एकच गोंधळ उडाला. ते आले तेव्हा प्रमुख पाहुणे उपस्थित नव्हते. इतरही मान्यवर येणे बाकी होते.  त्यामुळे घड्याळाकडे बघत ‘अरे मी काय लवकर आलो का’ अशी विचारणा केली. या वेळी उपस्थितांनी अर्धा तास अगोदर आल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्वांना एकत्र बसायला लावून चर्चा करायला सुरुवात केली.

रिक्षाचालकांचे प्रश्न, त्यांचे कल्याणकारी मंडळ व सध्या सुरू असलेला ट्रॅक व इतर अडचणी याबद्दल चर्चा केली. या नंतर समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल, याबद्दल विचारणा केली. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव हे देखील लवकरच आले होते. त्यामुळे त्यांच्या देखील तब्येतीची विचारपूस करत अनेक विषयावरती चर्चा केली. रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे, मुक्त रिक्षा परवाना बंद करणे,  इतर विविध प्रश्नांवर यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चर्चा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.