Ashadh : ओळख मराठी महिन्यांची – भाग 4 – व्रतवैकल्यांनी युक्त आषाढ महिना

एमपीसी न्यूज : (रंजना बांदेकर) – हिंदू पंचांगातील चौथा महिना आषाढ! व्रतवैकल्याने (Ashadh) युक्त असा हा आषाढ महिना असला तरी आपण आषाढाचा पहिला दिवस कालिदास दिन किंवा संस्कृत दिवस म्हणून साजरा करतो. महाकवी कालिदासांनी मेघदूत या महाकाव्यात आषाढस्य प्रथमदिने! असे म्हटले आहे.

आषाढ म्हटलं की आठवतो तो ढगांच्या पुंजक्यातून गर्जना करत कोसळणारा पाऊस. अशा प्रचंड पावसात कवयित्री इंदिरा संत यांची ‘नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली। ही कविता आठवल्याशिवाय राहत नाही किंवा बा.सी मर्ढेकरांची ‘आला आषाढ- श्रावण, आल्या पावसाच्या सरी। किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी । या कविता आठवल्याशिवाय राहत नाहीत.

आषाढ महिन्यापासून सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. 21 जून पासून हे ‘दक्षिणायन’ सुरू होत असते . या दिवशी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो 21 जूनला’ योग दिवस’ साजरा केला जातो.

तिसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी! चातुर्मासाची सुरुवात याच दिवशी होत असते. याला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. सारा महाराष्ट्र जणू वारीमय होऊन जातो. महिनाभर अगोदर निघालेले वारकरी संतांच्या पालख्या घेऊन एकादशीला पंढरपुरात पोहोचतात व तेथे विठू नामाचा नुसता गजर होतो.

आषाढात पंढरीची वारी। विठू भजनात दंग वारकरी।

यानंतर येणारा महत्त्वाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा! महाभारताचे लेखन करणारे (Ashadh) आणि वेद संकलित करण्याचे मोठे काम करणारे ऋषी’ वेद व्यास’ यांचा जन्मदिवस म्हणून या दिवशी व्यास पूजा केली जाते म्हणून याला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु।
गुरुर्देवो महेश्वरा।
गुरु साक्षात परब्रम्ह।
तस्मै श्री गुरुवे नमः।।

आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या. याला दिव्यांची अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ घासून त्यांची पूजा केली जाते. यामागील कारणही तसेच आहे. यानंतर येणाऱ्या सर्व महिन्यात अनेक सण व उत्सव साजरे केले जातात. त्यात दिव्यांचे अतिशय महत्त्व असते म्हणून हे दीपपूजन.

आषाढ महिन्यात जगन्नाथ यात्रा असते. दुर्गादेवीची उपासना, विष्णूची उपासनाही या महिन्यात केली जाते.

पुढचा महिना अधिक महिना आहे. यावर्षी श्रावण महिना अधिक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.