New Dehli : अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी दिला मुखाग्नी

एमपीसी न्यूज – भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन झाले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दिल्ली येथे मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी वाजपेयी यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे काल (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले.

आज वाजपेयी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात ठेवण्यात आले होते. विविध पक्षाच्या नेत्यांनी यावेळी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर अंतयात्रा काढण्यात आली, सायंकाळी दिल्लीतील राजघाटावरील राष्ट्रीय स्मृतीमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात अटलबिहारी वाजपेयी यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

यावेळी राष्ट्रपती कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजपाध्यक्ष अमित शाह, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेते अंत्यविधीला उपस्थित होते. अखेरचा निरोप देताना मोदी, अडवाणी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना अश्रू अनावर झाले. तिन्ही सेनादलप्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण करुन अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.