Chakan : ढोल वाजवण्याचे पैसे मागितल्यावरून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – बैलांच्या मिरवणुकीत ढोल वाजवल्यानंतर त्याचे पैसे मागणा-या दोन भावांना दोघांनी दगडाने मारहाण केली. तसेच त्यांना बघून घेण्याची धमकी दिली, अशी फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी साडेपाचच्या सुमारास खेड तालुक्यातील टेकवडे गावात घडली.

अजित बबन ससाणे (वय 21, रा. टेकवडे, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, नवनाथ बेंडुरे, शांताराम बेंडुरे (दोघे रा. टेकवडे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी टेकवडे गावात बैलपोळा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. आरोपी नवनाथ आणि शांताराम यांच्या बैलांची देखील शनिवारी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत फिर्याद अजित यांनी ढोल वाजवला. मिरवणूक गावातील राम मंदिरासमोर आली असता अजित यांचे भाऊ बबन यांनी आरोपींकडे ढोल वाजवण्याचे पैसे मागितले. त्यावरून आरोपींनी बबन यांना मारहाण केली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या अजित यांना देखील आरोपींनी शिवीगाळ करत दगड फेकून मारला. यामध्ये अजित यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ‘तुमची दोन तीन घरे आहेत. तुम्ही काय करता ते बघतो’ असे म्हणत आरोपींनी अजित यांना धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.