Ben Stokes: बेन स्टोक्सच्या निमित्ताने…

एमपीसी न्यूज (कौस्तुभ चाटे) – बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता तो फक्त कसोटी आणि टी20 क्रिकेट वर लक्ष केंद्रित करेल. बेन स्टोक्स, क्रिकेट जगतातील सध्याच्या घडीचा जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. अगदी काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडे इंग्लिश कसोटी संघाचे कर्णधारपद आले. (Ben Stokes) 2022 च्या जून महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध मालिका जिंकून त्याने आपले कर्णधारपद साजरे केले होते. पाठोपाठ भारताविरुद्धची कसोटी जिंकून मालिकाही 2-2 अशी बरोबरीत सोडवली. ही मालिका संपली आणि त्याने क्रिकेटच्या एका फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेट रसिकांसाठी हा एक धक्का होता नक्की.

अर्थात हा बेन स्टोक्सचा निर्णय होता आणि आपण त्या निर्णयाचा नक्कीच आदर केला पाहिजे. बेन स्टोक्सची ही बातमी आली, आणि पहिला विचार मनात आला तो म्हणजे, बरे झाले बेन स्टोक्स हा भारतीय उपखंडातील खेळाडू नाहीये. त्याने कोणत्या फॉरमॅट मधून कधी निवृत्ती घ्यावी आणि कोणत्या फॉरमॅट मध्ये खेळावे हे तो ठरवू शकतो, आणि त्याच्या देशाचे क्रिकेट रसिक त्या निर्णयाचा आदर करतात. स्टोक्स उपखंडातील खेळाडू असता तर कदाचित एव्हाना त्याच्यावर सूचनांचा एवढा मारा झाला असता की विचारता सोय नाही. असो, क्रिकेटचा अतिरेक होतो आहे ह्या कारणास्तव बेन स्टोक्सने एकदिवसीय सामन्यातून माघार घेतली आहे.

हे वाचल्यानंतर काही प्रश्न मनात आले. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आता एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप सुमारे एक वर्षाने होणार आहे. 2023 मध्ये हा विश्वचषक भारतात खेळवला जाईल. मग अशावेळी स्टोक्सने हे पाऊल का उचलले असावे? इंग्लंड हा सध्याचा विश्वचषक विजेता आहे. बेन स्टोक्स हा त्यांचा या फॉरमॅट मधला प्रमुख खेळाडू आहे. असे असताना देखील त्याने आपल्या वैयक्तिक भूमिकेला प्राधान्य दिले आणि संघाचा विचार बाजूला ठेवला, असे का?

एका फॉरमॅट मधून निवृत्त व्हायचे होते तर एकदिवसीय क्रिकेटच का? तो कसोटी किंवा टी20 मधून निवृत्ती जाहीर करून निदान विश्वचषका पर्यंत एकदिवसीय क्रिकेट खेळू शकला असता. (Ben Stokes) परत एकदा इंग्लंडला चांगली कामगिरी करण्यासाठी मदत करू शकला असता. पण तसे होणे नव्हते. स्टोक्स कसोटी आणि टी20 क्रिकेट खेळणे सुरु ठेवणार आहे.

 

 

कोणत्याही क्रिकेट खेळाडूसाठी कसोटी क्रिकेट जास्त महत्वाचे आहे. क्रिकेटचा हा सर्वात जुना फॉरमॅट ‘यंग जनरेशन’ साठी कितीही नावडता असला तरी खेळाडूंसाठी मात्र प्रिय आहे. 5 दिवस चालणाऱ्या ह्या खेळात प्रत्येक खेळाडूचा कस लागतो. कदाचित म्हणूनच त्याला ‘टेस्ट क्रिकेट’ किंवा मराठी मध्ये कसोटी म्हणतात. दुसरी महत्वाची गोष्ट  म्हणजे इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी हे कसोटी सामने बाकी कशाहीपेक्षा कणभर जास्तच प्रिय आहेत. या दोन देशांत रंगणारे ‘ऍशेस’ चे सामने 150 वर्ष जुने असले तरी तेवढ्याच प्रतिष्ठेने खेळले जातात.

काही महिन्यांपूर्वीच इंग्लिश संघ ही ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका हरला आहे. पुढची ऍशेस मालिका खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी इंग्लिश संघ आणि पर्यायाने स्टोक्स देखील उत्सुक असेल. (Ben Stokes) स्टोक्सला ऍशेस मालिकेसाठी स्वतःला जपणे आवश्यक वाटते. कदाचित खेळाडू म्हणून देखील त्याला कसोटी क्रिकेट जास्त महत्वाचे आणि कौशल्याचे वाटत असेल. नुकतीच स्टोक्सची इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली आहे.  इंग्लंडला पुन्हा एकदा ऍशेस मालिकेत विजय मिळवून देण्याचा त्याचा नक्कीच प्रयत्न असेल.

राहता राहिला प्रश्न टी20 क्रिकेटचा. टी20 हे सध्याच्या युगाचे क्रिकेट आहे. विशेषतः तरुण वर्गात टी20 सामने जास्तच लोकप्रिय आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बरोबरच टी20 क्रिकेट लीग्स मध्ये देखील खेळले जाते. इंडियन प्रीमियर लीग, बिग बॅश लीग, कॅरिबियन प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीग अशा अनेक स्पर्धा जगभरातील क्रिकेट रसिकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेतील लीगची देखील सुरुवात होते आहे. अशीही वदंता आहे की अमेरिकेतील क्रिकेट लीगची देखील लवकरच सुरुवात होईल.

टी20 क्रिकेट मध्ये पैसे आहेत. जगभरातले प्रेक्षक या क्रिकेट कडे नजर लावून असतात. या लीग्स साठी मिळणाऱ्या स्पॉन्सरशीपची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. या लीग्स मध्ये खेळाडूंना मिळणारे पैसे हा परिसंवादाचाच विषय ठरावा. अशावेळी कोणत्याही क्रिकेटपटू प्रमाणे स्टोक्सने देखील जर भविष्याचा विचार करून टी20 क्रिकेटला प्राधान्य दिले असेल तर त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही.

आवडता खेळ खेळायला मिळणे, त्यासाठी भरपूर पैसे – मानधन मिळणे, जगभरात आपले क्रिकेट मधील कौशल्य दाखवता येणे, जगभरात क्रिकेटच्या निमित्ताने फिरायला मिळणे, फॅन्स, मीडिया सगळ्यांच्या कायम समोर राहता येणे… कोणत्या क्रिकेटपटूला ह्या गोष्टी नको असतील? (Ben Stokes) या सगळ्याचा विचार करून बेन स्टोक्सने जर कसोटी आणि त्याच बरोबर टी20 क्रिकेट ची निवड केली असेल तर त्यात काय चूक आहे?

या सगळ्या गोष्टींमध्ये  एक मुद्दा समोर येतो तो म्हणजे एकदिवसीय क्रिकेट संपत चालले आहे का? काही काळापूर्वी हाच प्रश्न कसोटी क्रिकेटच्या बाबतीत विचारला जात असे. पण कसोटी क्रिकेटला मरण नाही. (असू नये असे माझे प्रामाणिक मत आहे.) कसोटी क्रिकेट मध्ये क्रिकेटच्या नैपुण्याचा कस लागणे खेळाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. टी20 क्रिकेट हे भविष्य आहे. पुढील 10-20 वर्षात असंख्य प्रकारच्या लीग्स आपल्याला क्रिकेट मध्ये दिसतील. त्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय क्रिकेट कदाचित कुठे तरी कमी पडेल असे वाटते. कदाचित भविष्यात प्रमुख देशांमध्ये कसोटी आणि टी20 मालिका आणि टी20 लीग्स जास्त दिसू लागतील.

अर्थात जाहिरातदारांचा विचार करता, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांना जास्त वाव आहे. तिथे होणारे सामने कसोटी सारखे ड्रॉ होत नाहीत (म्हणजे कमी वेळा होतात, आणि जे होतात ते देखील रंजक होतात.) आणि पूर्ण दिवस चालतात. या सगळ्याचा विचार करता हे क्रिकेट देखील अजून काही वर्षे नक्की टिकून राहील. आणि अर्थातच या अति क्रिकेटचा खेळाडूंवर नक्की परिणाम होणार आहे. आधीच अनेक खेळाडूंनी खेळाच्या एका प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढे ही संख्या नक्की वाढू शकते. क्रिकेट बोर्डांना आणि आयसीसीला देखील आता या बाबतीत काही ठोस विचार करण्याची वेळ आली आहे हे नक्की. पण बेन स्टोक्सच्या निमित्ताने परत एकदा या महत्वाच्या मुद्द्याकडे क्रिकेट प्रशासकांची लक्ष वेधले जाईल, आणि कदाचित (?) खेळाडूंच्या या अति क्रिकेटवर काहीतरी चांगला विचार होईल अशी आशा करूया.

बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या निर्णयाचा आदर करून त्याला इतर दोन्ही फॉरमॅट्स साठी खूप साऱ्या शुभेच्छा. एक क्रिकेट खेळाडू प्रगल्भ  होतो आहे. क्रिकेट रसिक म्हणून आपण देखील प्रगल्भ होण्याचा प्रयत्न करू.

सौजन्य – www.crickatha.com

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.