Pimpri News : ‘माझ्या कुटुंबाचा अपघात झालाय, मला मदत करा’ असा फोन आला तर सावधान ! खात्री करूनच मदत करा

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून एक व्यक्ती पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नागरिकांना फोन करत आहे. ‘माझ्या कुटुंबाचा अपघात झाला असून त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मला पैशांची आणि मदतीची गरज आहे. मदत करा’ असे सांगून अप्रत्यक्षरीत्या पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला अशा प्रकारचा फोन आला तर सावध रहा. मदत करण्यापूर्वी खात्री करा आणि मगच मदतीचा हात पुढे करा.

मागील पाच दिवसांपूर्वी ‘एमपीसी न्यूज’ कडे एक फोन आला. फोनवरील व्यक्ती गहिवरली होती. त्या व्यक्तीने त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगण्यास सुरुवात केली. ‘मी इंद्रायणी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. मी माझ्या कुटुंबासोबत एक आठवड्यापूर्वी तिरुपतीला गेलो होतो. तिथून परत येत असताना निपाणी जवळ माझ्या कारचा अपघात झाला. त्यात माझ्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. पत्नीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडला आहे. माझे एटीएम कार्ड बंद पडले आहे. त्यामुळे मी पैशांची देवाण घेवाण करू शकत नाही. स्थानिक आमदार, खासदार अथवा तुम्ही स्वतः काही मदत करू शकाल का?’ हा प्रसंग त्याच्यासोबत घडला असल्याचे सांगून मदतीसाठी याचना करून त्याने फोन ठेवला.

दरम्यान, त्याने खात्री पटावी यासाठी त्याच्या एका साथीदाराला देखील बोलण्यास सांगितले. तो साथीदार रुग्णवाहिकेचा चालक असल्याचे भासवण्यात आले. यामुळे खरोखर अपघात झाल्याबाबत नागरिकांची खात्री पटू शकते, असा फोनवरील व्यक्तीचा डाव होता.

‘एमपीसी न्यूज’ टीमला या व्यक्तीच्या बोलण्यातील खोटारडेपणा जाणवला. त्यामुळे त्याची चौकशी करण्यास टीमने सुरुवात केली. तळेगाव येथील एमपीसी न्यूजचे वार्ताहर प्रभाकर तुमकर यांनी इंद्रायणी महाविद्यालयात चौकशी करून अशी कोणी व्यक्ती तिथे प्राध्यापक म्हणून काम करत आहे का, याची चौकशी केली. मात्र इंद्रायणी महाविद्यालयात अशी कोणतीही व्यक्ती काम करत नसल्याचे आढळून आले.

त्यानंतर ‘एमपीसी न्यूज’ टीमने निपाणी पोलिसांशी संपर्क केला आणि त्यांच्या हद्दीत तसेच जवळपासच्या पोलिसांच्या हद्दीत अपघात झाल्याची घटना घडली आहे का, याची चौकशी केली. मात्र, निपाणी पोलिसांनी कोणताही अपघात झाला नसल्याचे सांगितले.

याच व्यक्तीचा फोन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांना बुधवारी (दि. 17) आला. त्यांनाही फोनवरील व्यक्तीने तीच कहाणी ऐकवली आणि मदत करण्याचे आवाहन केले. उपमहापौर घोळवे यांनाही याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी अधिक खात्री करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळेनंतर त्या व्यक्तीशी संपर्क होणं बंद झाले.

9284600430 या क्रमांकावरून ही व्यक्ती फोन करत आहे. त्याचा फोन क्रमांक ट्रू कॉलरवर स्पॅम नंबर म्हणून दाखवत आहे. जर तुम्हाला या क्रमांकावरून अथवा अन्य कोणत्याही क्रमांकावरून फोन आला तर अगोदर खात्री करा. मगच मदतीचा हात पुढे करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.