Nigdi News: स्वरांजलीच्या माध्यमातून लतादीदींना भावांजली अर्पण

एमपीसी न्यूज: नैनों में बदरा छाये, बिंदिया चमकेगी, मेंदीच्या पानावर, लग जा गले यांसारख्या सदाबहार, अवीट गोडीच्या गाण्यांचा नजराणा आपल्यासाठी कायमचा ठेवून गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर नुकत्याच अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी नगरसेवक अमित गावडे व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने स्वरांजली या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

प्राधिकरणात रविवारी(२० फेब्रुवारी) अलोट गर्दीत जमलेल्या संगीतप्रेमींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम एकापेक्षा एक सरस गाण्यांमुळे रसिकांच्या मनात घर करुन गेला. प्रतिलता असे ज्यांना म्हटले जाते त्या मिस्तु बर्धन आणि प्रति किशोरकुमार जितेंद्र भुरुक यांनी यावेळी सहगायकांच्या साथीने हिंदी मराठी गीते सादर केली. यावेळी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे विशेष उपस्थित होते. तसेच प्रणव पवार आणि एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार हे खास उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गजानना श्री गणराया या लतादीदींच्या अजरामर गणेशवंदनेने आरती आणि राजश्री यांनी केली. त्यानंतर रंगमंचावर आलेल्या मिस्तु यांनी लतादीदींचे असेच एक अजरामर देशभक्तीपर गीत ऐ मेरे वतन के लोगो त्यातील जोश, कारुण्य याचे यथार्थ दर्शन घडवत सादर केले. नंतर बिंदिया चमकेगी, नैनों में बदरा छाये ही गाणी पेश केली. त्यानंतर मंचावर आलेल्या जितेंद्र भुरुक यांच्या साथीने अभिमान या प्रसिद्ध चित्रपटातील तेरे मेरे मिलन की ये रैना हे गीत सादर केले. अब के सावन में जी जले, परदेसिया, तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही ही गीते जितेंद्र यांच्या साथीने सादर केली.

लतादीदींनी ज्याप्रमाणे हिंदी चित्रपटांसाठी गायन केले तसेच इतरही अनेक भाषांमधून गाणी गायली. मराठी ही तर त्यांची मातृभाषाच. म्हणून नंतर मिस्तु यांनी मेंदीच्या पानावर मन अजून झुलतंय गं, मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा ही गीते सादर केली. रसिकांच्या साथीने उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफिलीत नंतर प्यार हुआ इकरार हुआ, लग जा गले, जिया जले जान जले, माई री माई मुंडेर पे तेरी, दिल दिवाना बिन सजनाकें, इक प्यार का नगमा हैं, सलामें इश्क, बंगलेके पिछे, चुनरी संभाल गोरी, जयजय शिवशंकर काटा लगे ना कंकर, होटो में ऐसी बात यासारख्या उत्तरोत्तर रंगत गेलेल्या गाण्यांनी मैफिलीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

या स्वरांजलीची स्वरमय सांगता ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करण्यात आली.


या स्वरांजलीमध्ये कीबोर्डची संगीतसाथ चिंतन मोढा आणि रशीद शेख यांनी केली. तसेच लीड गिटार – मुकेश देढिया, बेस गिटार – विजू मूर्ती, बासरीसाथ सचिन वाघमारे, सतारसाथ प्रसाद गोंदकर, ड्रम्स – अभिषेक भुरुक, वेस्टर्न रिदम – अजय अत्रे, ढोलक, ढोलकी – केदार मोरे, तबलासाथ नितीन शिंदे, सॅक्सोफोन आणि ट्रंपेटसाथ बाबा खान यांनी समर्थपणे केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत समर्पक, अभ्यासपूर्ण आणि ओघवते निवेदन मिलींद कुलकर्णी यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष जोशी यांनी प्रास्तविक केले. चंद्रशेखर जोशी यांनी आभार मानले.

संपूर्ण कर्यक्रम पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.