Pimpri News: इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून शगुन चौकाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी भाजी मंडई येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून शगुन चौकाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुलावरील दुरुस्तीचे काम केले जात असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

इंदिरा गांधी उड्डाणपुलाचे दुरुस्तीचे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. सुरुवातीला आंबेडकर चौकाकडून आणि अहिल्यादेवी होळकर मोरवाडी चौकाकडून जाणाऱ्या दोन मार्गांचे दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यासाठी या दोन मार्गिका बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता उड्डाणपुलावरून शगुन चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचे दुरुस्तीचे काम केले जात आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

यानंतर भाटनगरकडे जाणाऱ्या मार्गाची दुरुस्ती केली जाणार आहे. दरम्यान काळेवाडी येथून एम्पायर इस्टेट, मोरवाडी मार्गे पिंपरीकडे वाहतूक वळवण्यात आली आहे. हा मार्ग बंद असल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. अरुंद रस्ता, अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक आणि पोलिसांची गैरहजेरी वाहतुकीचा खोळंबा होण्यास कारणीभूत ठरत आहे.

परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही. वाहतूक सुरळीत राहील यासाठी पोलीस कार्यरत असल्याचे पिंपरीचे पोलीस निरीक्षक (वाहतूक) रंगनाथ उंडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.