Bhimashankar : महाराष्ट्रातील श्री भीमाशंकर हेच धर्मशास्त्रांत वर्णित सहावे ज्योतिर्लिंग – महाराष्ट्र मंदिर महासंघ

एमपीसी न्यूज – आसाम सरकारने मंगळवारी (दि.14) एक (Bhimashankar) जाहिरात प्रसारीत करून पुण्यातील श्री भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग नसून आसाममधील गुवाहाटी येथील भीमाशंकर हे खरे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप चालू झाले आहेत. मात्र, या विषयावर राजकीय वाद नकोत तसेच महाराष्ट्रातील श्री भीमाशंकर हेच धर्मशास्त्रांत वर्णित सहावे ज्योतिर्लिंग आहे, अशी भूमिका महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतली आहे.

त्यांनी या संबंधी प्रसिद्धी पत्रक जाहीर केले असून त्यात म्हटले आहे की, तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे आदी धार्मिक गोष्टींमध्ये राजकारण होणे दुर्दैवी आहे. देव, धर्म, धर्मग्रंथ, प्रथा-परंपरा, तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे, मंदिरे आदी धार्मिक गोष्टींविषयी धार्मिक क्षेत्रातील तज्ञ अर्थात शंकराचार्य, धर्माचार्य, संत-महंत आदी अधिकारी व्यक्तींना बोलण्याचा अधिकार आहे.

राजकारण्यांनी धार्मिक गोष्टींबद्दल न बोललेलेच बरे. स्वत: आद्य शंकराचार्य यांच्या बारा (Bhimashankar) ज्योतिर्लिंग श्लोक, तसेच शिवलिलामृत ग्रंथ, शिवपुराण आदी अनेक मान्यताप्राप्त धर्मग्रंथांमध्ये पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर हेच सहावे भगवान शिवाचे स्वयंभू ज्योतिर्लिंग असल्याचे स्वयंस्पष्ट आहे.

Bhimashankar : भीमशंकर ज्योतिर्लिंगावरून आसाम आणि महाराष्ट्रात वाद; अध्यात्मिक वारसा पळविण्याचा भाजपचा घाट???

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये भीमा नदीचे उगमस्थान असलेल्या घनदाट जंगलातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेले श्री भीमाशंकर हेच अत्यंत प्राचीन आणि सहावे ज्योतिर्लिंग देवस्थान आहे, असे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंकराचार्य-धर्माचार्य यांचे मार्गदर्शन घेऊन पुणे जिल्ह्यातील श्री भीमाशंकर हेच सहावे ज्योतिर्लिंग असल्याची भूमिका देशासमोर मांडावी, असे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.