Bhosari : व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाणा-या मामावर व्यसनाधीन भाच्याने केला खूनी हल्ला; भाच्याला अटक

एमपीसी न्यूज – व्यसनाच्या आहारी गेलेल्या भाच्याला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जात असताना व्यसनाधीन भाच्याने मामाच्या गळ्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात मामा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 24) सकाळी साडेदहाच्या सुमारास कासारवाडी येथे घडली. व्यसनाधीन भाच्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली.

लालबहाद्दूर भोटे विश्वकर्मा (वय 25, रा. सागर प्लाझा कॉम्प्लेक्स समोर, कासारवाडी), असे अटक केलेल्या आरोपी भाच्याचे नाव आहे. परम विश्वकर्मा (वय 34) असे जखमी मामाचे नाव आहे. याप्रकरणी दीपा परम विश्वकर्मा (वय 30) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लालबहादूर हा व्यसनाधीन झाला आहे. त्याचे व्यसन सोडविण्यासाठी जखमी मामा परम हे त्याला घेऊन व्यसनमुक्ती केंद्रात जात होते. मंगळवारी व्यसनमुक्ती केंद्रात जात असताना चिढलेल्या लालबहाद्दूर याने परम यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. यामध्ये परम गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी परम यांची पत्नी दीपा यांनी भोसरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याचा भोसरी पोलिसांसोबत समांतर तपास करताना गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी वल्लभनगर एसटी स्टॅन्ड परिसरात फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी एसटी स्टॅन्ड परिसरात सापळा रचून लालबहाद्दूर याला अटक केली. गुन्ह्यासाठी वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई , सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र गावंडे, रवींद्र राठोड, शिवाजी कानडे, प्रमोद लांडे, बाळू कोकाटे, मनोजकुमार कमले, अमित गायकवाड, मारुती जायभाये, प्रमोद गर्जे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.