Bhosari : उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगत महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या तोतयावर विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगत महिलेशी ऑनलाइन ओळख वाढवली. तसेच महिलेच्या घरी येऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. या प्रकरणी एका तोतयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 सप्टेंबर ते 22 डिसेंबर 2019 या कालावधीत घडली.

सुयश किसन मुळूक (रा. गंगापूर, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 34 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुयश याने शादी डॉट कॉम या वधूवरसूचक संकेतस्थळावरून फिर्यादी महिलेशी ओळख केली. तसेच त्याने महिलेला ऑनलाइन फोटो पाठवून लग्नाची मागणी केली. आरोपी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेशी ओळख वाढवून तो महिलेच्या घरी आला.

महिलेचे एक लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे. आरोपीने त्या मुलीसोबत फोटो काढले. हे फोटो काढण्यासाठी फिर्यादी महिलेने हरकत घेतली. मात्र तरीही आरोपीने ते फोटो डिलीट केले नाहीत. तसेच आरोपीने फिर्यादी महिलेशी घरात गैरवर्तन करत लग्नाची विचारणा केली. लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी व अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी सोबत लग्न केल्याचा खोटा दावा केला. फिर्यादी महिलेने लग्नाची तारीख, वेळ व ठिकाण विचारले असता आरोपीने अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.