Bhosari : कोऱ्या चेकचा गैरवापर करत कंपनीच्या खात्यातून काढले लाखो रुपये

अकाउंटंटसह सहा जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीने दिलेल्या को-या चेकचा गैरवापर करून त्याद्वारे कंपनीच्या खात्यातून लाखो रुपये काढून घेतले. तसेच स्वतःचा पगार वाढवून घेत कंपनीच्या मालाची परस्पर विक्री केली. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार भोसरी एमआयडीसी मधील इलेक्ट्रॉनिक झोनमध्ये घडला.

रामदास मानसिंग माने (वय 59, रा. रामायण बंगला, संभाजी नगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल विठ्ठल दरेकर (रा. संतनगर, मोशी) आणि अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल फिर्यादी यांच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतो. मागील दीड वर्षांपासून त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून कंपनीच्या कामासाठी दिलेल्या को-या चेकचा गैरवापर करून कंपनीच्या खात्यातून काही रक्कम काढली. तसेच स्वतःच्या वेतनामध्ये जास्तीची रक्कम काढली आणि कंपनीच्या मालाची देखील परस्पर विक्री केली. आरोपींनी एकूण 3 लाख 15 हजार 904 रुपयांचा अपहार केला. फिर्यादी रामदास यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरोपींकडे याबाबत विचारणा केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत त्यातील 2 लाख 76 हजार 160 रुपये कंपनीला परत केले असून उर्वरित 39 हजार 744 रुपये कंपनीला परत केले नाहीत. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.