Bhosari: भोसरीत उद्यापासून ‘इंद्रायणी थडी जत्रा’

एमपीसी न्यूज – महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात येणारी चार दिवसीय ‘इंद्रायणी थडी’ जत्रा उद्या (गुरुवार) पासून सुरु होणार आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जत्रेचे उद्घाटन होणार आहे. याबाबतची माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिली.

गुरुवार ते रविवारपर्यत या चार दिवस खाद्य महोत्सव, मनोरंजन, प्रबोधन आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यारी ही जत्रा लक्षवेधी ठरणार आहे. प्रबोधनात्मक कीर्तन, अभंग बँड, पारंपरिक नृत्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा, मंगळगौरी खेळ आणि उखाणे स्पर्धा अशा अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी जत्रेत येणाऱ्या नागरिकांना अनुभवता येणार आहे.

गुरुवारी (दि. 30) सायंकाळी 5 वाजता ‘चला हवा येऊ द्या’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारपासून खेळ बाहुल्यांचा (पपेट शो), मॅजिक शो, फॅशन शो, बाल जत्रा, मनोरंजन, कला, सांस्कृतिक, गावरान खाद्यपदार्थ महोत्सव, सामाजिक उपक्रम अशा भरगच्च विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.