Bhosari News: भोसरी खून प्रकरण; गुन्हेगारी टोळीच्या नावाचा श्रेयवाद बेतला जीवावर

टोळीच्या नावाने काढलेल्या टॅटूवरून झालेल्या वादातून नऊ जणांनी मिळून शेवटी 'त्या' तरुणाचा खून केला.

एमपीसी न्यूज – भोसरी येथे झालेल्या खून प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आणि मृत हे सराईत गुन्हेगार होते. त्यांनी एका गुन्हेगारी टोळीही सुरु केली होती. मात्र, टोळीचे नाव टोळीतील दोघांच्या नावाशी मिळते जुळते असल्याने त्यांच्यात नावाचा श्रेयवाद सुरु झाला. गुन्हेगारी टोळीच्या नावाचा श्रेयवाद शेवटी एकाच्या जीवावर बेतला. टोळीच्या नावाने काढलेल्या टॅटूवरून झालेल्या वादातून नऊ जणांनी मिळून शेवटी ‘त्या’ तरुणाचा खून केला.

मयूर हरिदास मडके (वय 26, रा. मरकळ रोड, आळंदी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मृत मयूरचा मित्र दिनेश खेताराम चौधरी (वय 21, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंगेश शुक्राचार्य मोरे (रा. देवंग्रा, ता. औसा, जि. लातुर), रोशन हरी सौडतकर (रा. दिघी रोड, भोसरी), प्रणेश चंद्रकात घोरपडे (रा. विजयनगर, दिघी), शुभम बलराम वाणी (रा. चौधरी पार्क दिघी), वैभव तान्हाजी ढोरे (रा. भवानी पेठ, काशेवाडी, पुणे) अशी भोसरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

मृत मयूर मडके आणि आरोपी मंगेश मोरे या दोघांनी मिळून ‘एमएम ग्रुप’ नावाची गुन्हेगारी टोळी निर्माण केली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार मयूर मडके होता. मयूर मडके आणि मंगेश मोरे या दोघांच्या नावातील आणि आडनावातील आद्याक्षराने या गुन्हेगारी टोळीची स्थापना करण्यात आली होती.

टोळीत अनेक सदस्य आहेत. काही सदस्यांनी आपल्या हातावर टोळीच्या नावाचा टॅटू देखील काढला आहे. मात्र, टोळीचे नाव तुझ्या नावावरून आहे की माझ्या नावावरून आहे, या श्रेयवादावरून मयूर आणि मंगेश यांच्यामध्ये वारंवार खटके उडत. त्यांचे मागील काही दिवसांपूर्वी यावरून भांडण देखील झाले होते.

दि. 8 ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी दिनेश चौधरी, मयूर मडके, दशरथ देवकाते हे तिघेजण काळे कॉलनी, आळंदी येथून दारू पिऊन आले. त्यानंतर ते दिनेश चौधरीच्या घरासमोरील साईसिद्ध सोसायटीत श्रीकांत गव्हाणे यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीमध्ये गप्पा मारत बसले.

त्यावेळी फिर्यादीचे मित्र मंगेश मोरे, रोशन सौडतकर, अमित शेकापुरे (लाडू), निखील ढाबळे हे चौघेजण दिनेशकडे आले. आरोपी मंगेश मोरे याने फिर्यादी यांना सांगितले की, ‘मला मयूरशी खासगी बोलायचे आहे.’ त्यामुळे फिर्यादी दिनेश आणि दशरथ देवकाते बाजूला जाऊन थांबले. त्यावेळी आरोपीचे आणखी मित्र शुभम वाणी, प्रणेश घोरपडे आणि अन्य तिघेजण काही अंतरावर थांबले होते.

टोळीच्या श्रेयवादावरून मयूर आणि मंगेश यांच्यात पुन्हा भांडण सुरु झाले. मंगेशने त्याच्या कमरेला लावलेला कोयता काढला आणि मयूरच्या डोक्यात मारला. अन्य साथीदारांनी देखील कोयत्याने मयूरच्या पाठीत आणि डोक्यावर मारले. मयूर रक्ताच्या थारोळ्यात पडला. दशरथ देवकाते त्याला सोडविण्यासाठी गेला असता आरोपींनी दशरथच्या पाठीत कोयता मारून त्यालाही खाली पाडले.

त्यानंतर तीन आरोपी फिर्यादी दिनेशकडे कोयते घेऊन आले. दिनेशने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारली आणि जीव वाचवला. मात्र, यामध्ये दिनेशच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दिनेश लंगडत जाऊन एका इमारतीच्या आडोशाला थांबला. मंगेश मोरे आणि त्याचे साथीदार तिथून पळून गेले.

त्यानंतर दिनेशने पोलिसांना फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. दिनेश आणि दशरथ यांनी मयूरला पिंपरी येथील डी वाय पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डी वाय पाटील रुग्णालयाने मयूरला वायसीएम रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. वायसीएम रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच मयूरचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

खून केल्यानंतर सर्व आरोपी मंगेश मोरे याच्या लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या गावी निघाले होते. मात्र, भोसरी पोलिसांनी त्यांचा सोलापूर महामार्गावर पाठलाग करून काही तासांतच अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.