Bhosari News: बालनगरीतील कोविड सेंटर दोन दिवसात कार्यान्वित होणार – आयुक्त हर्डीकर

बालनगरीत 425 बेडची क्षमता असलेल्या कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. : covid Center in Balnagari will be operational in two days - Commissioner Hardikar

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जम्बो सुविधा करण्यात येत आहेत. पालिकेतर्फे भोसरीतील  बालनगरीच्या इमारतीमध्ये उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. 425 बेडची क्षमता असलेले हे सेंटर दोन दिवसात कार्यान्वित होणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त हर्डीकर यांनी याबाबतची माहिती दिली.

ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करत आहोत. बेडची क्षमता वाढविली जात आहे. ऑक्सिजन बेडची कमतरता नाही.

भोसरी गवळीमाथा येथील एमआयडीसीच्या भुखंडावर महापालिकेने बालनगरी ही इमारत उभारली आहे. बालनगरीत 425 बेडची क्षमता असलेल्या कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यात 80 टक्के ऑक्सीजन बेड असणार आहेत.  परवापर्यंत ते कार्यान्वित होईल.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयसीयू आणि ऑक्सीजन बेड तयार केले जात आहेत.  तेथे 250 बेडची क्षमता आहे. त्याचे काम वेगात सुरु आहे. काम लवकर पूर्ण करुन कार्यान्वित करण्याला आमचे प्राधान्य आहे.

याशिवाय वायसीएम रुग्णालयात 30 आयसीयूचे बेड सुरु करत आहोत. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त बेडची कमतरता भासणार नाही, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडी आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एकत्रितपणे नेहरूनगर येथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे.

200 आयसीयूचे तर 600 इतर बेड उपलब्ध असणार आहेत. त्याचेही काम वेगात सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.