Bhosari Corona news: भोसरी रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा उभारण्यासाठी निधी द्या – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना महामारी दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर भोसरी येथील महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक निधी तात्काळ मंजूर करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने भोसरी येथील नवीन रुग्णालय हे संपूर्णत: कोविड-19 केंद्र म्हणून कार्यान्वयीत करण्यात आले आहे. या रुग्णालयामध्ये कोविड आजाराचे गंभीर तसेच ऑक्सिजन आवश्यक असलेले रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

सध्या सुमारे 120 कोविड पॉझिटीव्ह रुग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत. रुग्णालयात 10 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत.

मात्र, या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा हा नियमित होत नाही. ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा अनियमित होत असल्यामुळे 710 एलपीएम क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा उभारण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जातो. विविध रुग्णालयांच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत चिंताजनक माहिती समोर आली. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीसाठी तात्काळ कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.