Bhosari News : व्यायामशाळा नूतनीकरणासाठी सव्वातीन कोटींचा खर्च होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील सीताराम लोंढे उद्यानातील भवानी तालीम व्यायामशाळेचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 कोटी 39 लाख रुपये खर्च होणार आहेत.

भोसरी प्रभाग क्रमांक सातमधील सीताराम लोंढे उद्यानात महापालिकेची भवानी तालीम व्यायामशाळा आहे. या व्यायामशाळेचे नूतनीकरण तसेच इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत.

या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी 3 कोटी 89 लाख 98 हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टिंग शुल्क वगळून 3 कोटी 89 लाख 68 हजार रुपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या.

त्यानुसार तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी सिद्धनाथ कॉर्पोरेशन या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 15.71 टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच 3 कोटी 28 लाख 46 हजार रुपये अधिक रॉयल्टी चार्जेस 30 हजार रुपये आणि मटेरियल टेस्टिंग चार्जेसपोटी 10 लाख 37 हजार रुपये असे एकूण 3 कोटी 39 लाख रुपये खर्च होणार आहेत.

महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी या कामांची निविदा स्वीकारण्यास 6 जून रोजी मान्यता दिली आहे. एका वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.