Big Breaking News: एकनाथ शिंदे होणार नवे मुख्यमंत्री, संध्याकाळी साडेसात वाजता शपथविधी

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आज दुपारी पुन्हा नाट्यपूर्ण कलाटणी (Big Breaking News) मिळाली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा भाजपचे विधानसभेतील गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. शिंदे यांचा शपथविधी संध्याकाळी साडेसात वाजता होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे पायउतार झाल्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हेच नवे मुख्यमंत्री तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील, असे मानले जात होते. संध्याकाळी दोघांचा शपथविधी होईल, असे गृहीत धरून शपथविधी समारंभाची जय्यत तयारी देखील सुरू झाली होती. ‘मी पुन्हा येईन…’ या देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणाऱ्या जाहिराती भाजपच्या वतीने सोशल मीडियावर सुरू होत्या.

गोव्याहून एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या समवेत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव जाहीर करीत सर्वांनाच मोठा धक्का (Big Breaking News) दिला.

Mahesh Landage : आमदार महेश लांडगे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार?

आम्ही भाजप-शिवसेना युती म्हणून निवडणूक लढवली होती. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला युती म्हणून बहुमत दिले होते. पण शिवसेना पक्षप्रमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला बरोबर घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. ही आघाडी अनैसर्गिक होती. त्यामुळे सरकार टिकणे अवघड होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे ते पडले, असे फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदे हे संध्याकाळी साडेसात वाजता एकटे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांना भाजप पाठिंबा देईल. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येईल. मी स्वतः मंत्रिमंडळाबाहेर राहीन, मात्र माझे पूर्ण सहकार्य शिंदे आणि नव्या मंत्रिमंडळाला लाभेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “या संबंधी भाजपने आम्हाला साथ दिली, संख्याबळानुसार त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा न लावता बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिलं. हा देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस आमच्या पाठिशी आहे. ते मंत्रिमंडळात नसले तरी ते राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. ”

एकनाथ शिंदे म्हणाले की, “राज्याचा विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास हा अजेंडा म्हणून आम्ही पुढे निघालो आहोत. एक वैचारिक भूमिका घेऊन आम्ही जात आहोत. गेल्या काही काळांमध्ये आम्ही उद्धव ठाकरेंना आमच्या मतदारसंघातील अडचणींची माहिती दिली, त्यामध्ये सुधारणा व्हावी अशी मागणी केली. पुढच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणे याचाही विचार आम्ही केला. राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक गोष्टी होत्या, महाविकास आघाडीमध्ये त्यावर निर्णय घेता येत नव्हते. पक्षाचे 50 आमदार ज्यावेळी वेगळी भूमिका घेतात, त्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज होती.”

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन 50 आमदारानी वेगळी भूमिका घेतली, त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही. हे सरकार लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यास कटीबद्ध आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.