Bitcoin Scam : बिटकॉइन घोटाळा ! ओबामा, एलोन मस्क, जेफ बेझोस, बिल गेट्ससह दिग्गजांचे ट्विटर हॅण्डल हॅक

Bitcoin scam! Hacked Twitter handles of veterans including Obama, Elon Musk, Jeff Bezos, Bill Gates ;ॲपल, उबरसारख्या कंपन्याही हॅकर्सच्या निशाण्यावर

एमपीसी न्यूज – अमेरिकेतील अनेक दिग्गज राजकारणी, उद्योजकांचे ट्विटर हॅण्डल हॅक झाले आहे. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, टेस्लाचे सीईओ एलन मस्क, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार जो बायडन यासारख्या दिग्गजांचे ट्विटर हॅण्डल हॅक झाले आहे. क्रिप्टो करन्सीच्या घोटाळ्यातून हे हॅकिंग झाले असल्याचे सांगितले जात आहे.

हॅकर्सने हॅक केलेल्या ट्विटर हॅण्डलवर एक ट्विट करत लिंक दिली होती. यामध्ये बिट कॉइनच्या व्यवहाराबाबत नमूद करण्यात आले होते. ‘तुम्ही मला, जेवढे बिटकॉइन द्याल, त्याच्या दुप्पट बिटकॉइन तुम्हाला देणार’, असे ट्विटमध्ये म्हटले होते.

ॲपलच्या ट्विटर हॅण्डलवर, ‘आम्ही तु्म्हाला काही देऊ इच्छितो. तुम्ही आम्हाला पाठिंबा देऊन सहकार्य कराल’ अशी अपेक्षा आहे. जेवढे बिटकॉइन तुम्ही आम्हाला पाठवाल, त्याच्या दुप्पट आम्ही तुम्हाला बिटकॉइन देणार असून ही ऑफर फक्त 30 मिनिटांसाठी आहे’, असे ट्विट करण्यात आले होते.

टेस्ला कंपनीचा प्रमुख एलन मस्क यांच्या ट्विटर हॅण्डलवरून अशाच आशयाचे ट्विट करण्यात आले होते. कोविड-19 मुळे लोकांना बिट कॉइन दुप्पट करून देत असून ही सुरक्षित प्रक्रिया असल्याचे ट्विट करण्यात आले.

ॲमेझॉन कंपनीचे प्रमुख जेफ बेझोस यांचेही ट्विटर हॅण्डल हॅक करण्यात आले आहे. अशाचप्रकारचे ट्विट अनेक कंपन्यांच्या हॅण्डलवरून करण्यात आले. ॲपल, उबरसारख्या कंपन्याही हॅकर्सच्या निशाण्यावर होत्या.

या कंपन्यांच्या हॅण्डलवरून बिटकॉइन घोटाळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी अनेक नामांकित व्यक्ती आणि कंपन्यांचे ट्विटर हॅण्डल हॅक झाल्यामुळे लोकांनी ट्विटरवर प्रश्नांची सरबत्ती करत सुरक्षितेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.