Pune news: भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी – चंद्रकांत पाटील 

BJP delegation visits Delhi for state development.

एमपीसी न्यूज- भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या नेत्यांचे शिष्टमंडळ पक्षाच्या पूर्वनियोजित योजनेनुसार आपल्या नेतृत्वाखाली तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले व त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगत प्रकाश नड्डा जी, राष्ट्रीय संघटनमंत्री मा. संतोषजी यांच्यासह भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. राज्यातील संघटनात्मक कार्य आणि विकासकामांच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत उपयुक्त ठऱला. तथापि, पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याची कोणतीही चर्चा त्यामध्ये नव्हती, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी मुंबईत दिली.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, प्रदेश सरचिटणीस (संघटन) श्रीकांत भारतीय आणि प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, दरवर्षी संसदेच्या एका अधिवेशनात राज्यातील भाजपा नेत्यांनी दिल्लीत जावे आणि पक्षाच्या खासदारांशी राज्यातील प्रश्नांच्या पाठपुराव्याबाबत विचारविनिमय करावा, अशी पक्षाची परंपरा आहे. कोरोनामुळे ही परंपरा खंडीत झाली होती. आता पुन्हा त्या पद्धतीने आपल्या नेतृत्वाखाली प्रदेश संघटनेतील निवडक नेत्यांचे शिष्टमंडळ तीन दिवस दिल्ली भेटीवर गेले होते.

या भेटीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संघटनमंत्र्यांना भेटण्यासोबतच राज्यातील नवनियुक्त केंद्रीय मंत्री तसेच ज्येष्ठ मंत्र्यांची भेट झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी भोजनाच्या निमित्ताने सर्व खासदारांची भेट झाली. या भोजन समारंभात विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सचिव मा. विनोद तावडे व मा. पंकजा मुंडे सहभागी झाले. या विचारविनिमयातून राज्यातील विकासकामांच्या दृष्टीने बरीच उपयुक्त माहिती मिळाली. आता नियमितपणे पक्षाचे राज्यातील पदाधिकारी दिल्लीत जाऊन राज्याच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करतील.

ते म्हणाले की, आपल्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ हे केवळ संघटनात्मक आणि विकासकामांच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी गेले होते. राज्यात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचा विषय नव्हता. संघटनात्मक पदांसाठी लॉबिंगच्या बातम्या निराधार आहेत.

त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती आपण केंद्रीय नेतृत्वाला दिली. ठाकरे यांच्यासोबतची भेट भूमिका समजून घेण्यासाठी होती व त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या युतीचा प्रस्ताव नव्हता, असे आपण केंद्रीय नेतृत्वाला सांगितले.

ते म्हणाले की, मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडण्याचा विषय गंभीर आहे. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महसूल मिळण्यासाठी मंदिरांपेक्षा दारूच्या दुकानांना महत्त्व प्राप्त झाले आहे. संत महंतांच्या महाराष्ट्रात संस्कृतीचा नाश झाला आहे. सरकार मंदिरे आणि व्यापार बंद ठेवताना दारुच्या दुकांनाना परवानगी देते आणि होम डिलीव्हरीसाठी मदत करते. तेव्हा मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडणे स्वाभाविक आहे.

राज्य सरकारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत गंभीर गुन्हा घडत आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे झालेल्या बदलीच्या कायद्याचे उल्लंघन महाविकास आघाडी सरकारकडून होत आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कायदा मोडू नये असे आवाहन केले होते. परंतु त्यांच्याकडून उत्तर आले नाही. त्यामुळे आता न्यायालयात दाद मागू, असा इशारा त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.