Bollywood Boycott : हे बॉयकॉट का असते भाऊ?

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे ): सध्या आमचा एक मित्र फारच तणावात आहे, कारणही तसेच आहे. त्याला हिंदीतल्या एका खूप मोठ्या चित्रपट निर्मिती संस्थेत त्याला निर्मिती सहाय्य्यकाची नोकरी मिळाली आहे. त्याचे पहिले काम असलेला चित्रपट लवकरच प्रदर्शितही होणार आहे. दिवस-रात्र, तहान भूक विसरून भाऊने लईच काम केले आहे. त्यात अगदी छोटीशी भूमिका ही त्याने केलीये. आणि तीही एका मोठ्या स्टार सोबत काही क्षण तो मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. हा आमचा मित्र फारच उत्तेजित झाला होता. जेव्हा त्याला संकलन विभागाकडून कळले, की त्याचा शॉट हा चित्रपटाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा (Bollywood Boycott) असल्याने तो ठेवला आहे.

त्याला या चित्रपटाबद्दल खूपच ममत्व वाटल्याने तो आम्हा सर्व मित्रांना, भेटेल त्याला चित्रपटाबद्दल सांगत असतो. त्या चित्रपटाशी संबंधित प्रसिद्धीसाठीच्या पोस्टही तो आपुलकीने समाजमाध्यमावर प्रसारित करत असतो. त्याचीही एकूणच प्रगती बघून छान वाटते.

पण, आज सकाळी समाजमाध्यमावर त्याच्या पोस्ट खाली आलेल्या प्रतिक्रिया वाचून धक्काच बसला. फक्त आम्हालाच नव्हे, तर त्या मित्राला सुद्धा! काही आमच्याच मित्र परिवारातील काहींनी हा चित्रपट पाहू नका, अशा आशयाचे संदेशच प्रसारित केले होते. या पुढे जाऊन निर्मितीसंस्था बहिष्कृत करण्याचे आव्हान केले होते. यावर व्यक्त व्हावे असे वाटत होते. पण, ते सगळेच फारच पातळी सोडून लिहिले गेलेले असल्याने आणि आपण त्या पातळीवर जाऊ शकत नसल्याने असेल आणि त्याबद्दल फारशी माहिती न घेता व्यक्त कसे व्हायचे? हे कळत नसल्याने गप्प बसलो. मित्रांपैकी जे जे व्यक्त होत होते, त्या सगळ्यांचाच यथोचित पाणउतारा होताना असहाय्यपणे बघत बसावा लागत होता.

त्यात शिव्या शाप तर होताच पण एक वाक्य उगीचच टोचत होते. ‘हा चित्रपट अमुक निर्मिती संस्थेने बनवला आहे. त्याचा मालक अमुक अमुक हा गद्दार आहे. शिवाय त्यात घेतलेला स्टारही देशद्रोही आहे. शिवाय दुसर्‍या धर्माशी संबंधित चित्रपटाचे नाव आहे. त्यामुळे हा चित्रपट पाडा. आणि या चित्रपटाशी संबंधित लोकांना देशोधडीला लावा”.

आमचा जवळचा मित्रही त्यात आहे हो! खूप काबाड कष्ट करून आज तो तिथे त्या निर्मिती संस्थेपर्यंत पोहोचलाय. आज त्याचे घर या कामावर चालते आहे. शिवाय मुंबईत कसाबसा तो आपली गुजराण करतोय. आणि असे बरेच आहेत. ज्यांची घर या सगळ्यावर चालत आहेत. असे सहज म्हणणे, की लावा देशोधडीला, करा बेकार या चित्रपटातल्या प्रत्येकाला, हे बोलणे, लिहिणे खूप सोपे आहे हो! पण, प्रत्यक्ष परिस्थिती खूप वेगळी आहे. जी आपल्याला कळणार ही नाही. एक कुणी तरी स्टार किंवा एक चमू काही तरी प्रसिद्धीसाठी, वाद निर्माण करण्यासाठी काही तरी बोलतो, लिहितो, काहीतरी दाखवतो, म्हणून आम्ही असे सरसकट त्यांनी भाग घेतलेल्या कलाकृती फोडणार का? त्यात काम करणार्‍या इतर कलाकार आणि कामगारांचे भवितव्य धोक्यात आणणार? कारण ही निर्मिती संस्था बंद झाली, तर हजारो बेकार होणार दुसरे काम मिळेपर्यंत, त्यांना असेच मरु द्यावे का? त्यापेक्षा आम्ही जर सारासार विचार करून प्रत्येक गोष्टीचे मर्म शोधून त्यावर प्रतिक्रिया दिली. तर ते जास्त सोयिस्कर नाही का ?

बर, हे जे कोण स्टार आहेत, ज्यांनी खरच देशविघातक काम केलय त्यांना कायद्याने शिक्षा होऊ द्या, ती कशी होईल हे बघायला हवे. कारण शेवटी कुठलीही कलाकृती ही मोठ्या संख्येच्या समूहाने तयार केलेली असते. कुणी तरी एक जण ती नाही तयार करत. एकदा चित्रपटाच्या (Bollywood Boycott) शेवटी येणार्‍या श्रेयनामावलीकडे बघितले ना, तरी कळेल. की चित्रपट बनवणे येर्‍यागबाळ्याचे काम नव्हे!

Shirgaon News: शिरगांव येथे विद्युत शॉक लागून शेतात शेतकऱ्याचा मृत्यू

आणि आजकाल विचारसारणी माहीत नसताना सरसकट त्याचा बुरखा पांघरून हुकुमशाही करण्याची जी वृत्ती समाजात दिसतीये ना ती घातक आहे. त्या ही पेक्षा घातक आहे, ते म्हणजे सरसकट वर्गीकरण करण्याची, आणि आपल्या विचारांच्या विरुद्ध कुणी एकदा जरी मत व्यक्त केले तर बॉयकॉटचे अस्त्र उगारण्याची ही खोड वाईट आहे. त्यात समाज माध्यमांवर सर्रास शिव्यांची लाखोली वाहाणे हे नित्यनेमाने होणे गंभीर आहे. ही विकृती आहे.आणि या विकृतीचा खरतर बॉयकॉट व्हायला हवा. कारण हे असले शिव्या देणे हा आपल्या संस्कृतीचा, पर्यायाने देशाचा अपमान आहे.

बाहेरची लोक कदाचित आपल्या प्रतिक्रिया एखाद्या चित्रपटावरच्या या भाषांतरित करून घेऊन वाचत असतील. (कारण तशी सोय असते समाजमाध्यमावर ) तेव्हा ते काय विचार करत असतील. अजून ही आपण बाहेरच्या देशामध्ये सहिष्णू समजले जातो. त्याला डाग लागत नाही काय? सहिष्णुता, मानवता याचे धडे खरतर अनेक विदेशी लोक आपल्या देशाकडूनच घेतात. त्यांना काय वाटत असेल?

आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्या अशा बॉयकॉट करण्याने नक्की आपण काय साधतोय? फक्त समाजातला राग वाढतोय, की काहीतरी सकस असे खरच घडते आहे. कारण या दरम्यान ज्या चांगल्या कलाकृती आल्या काही अपवाद वगळता आपण त्याला तरी कुठे भरभरून प्रतिसाद दिला आहे. काही खरच चांगले चित्रपटही आले होते. उदाहरण द्यायचे झाल्यास आर माधवनच्या आत्ताच्या रॉकेटरी नावाच्या चित्रपटाचे देता येईल. इतका सुंदर विषय असून सुद्धा बॉक्सऑफिसवर त्याचा गल्ला हा तसा रिकामाच तर होता ना हो! असे चित्रपट आम्ही या बॉयकॉटच्या या वादंगात पाहायला विसरलो वाटते.

हे असे नाही व्हायला पाहिजे, असे वाटते. शेवटी निर्णय प्रत्येकाने आपापला घ्यायला हवा. एकदा सेन्सॉर झालेला चित्रपट हा प्रदर्शनासाठी खुला होत असताना त्याच्यावर बंदी घालण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. आपण कुणालाही बळजबरी करूही शकत नाही. कायद्यानेही अन मानवतेच्या दृष्टिकोनातूनही आपण नाही हे ठरवू शकत, की कुठल्या चित्रपटाचा सामाजिक बहिष्कार करायचा अन कुठल्या नाही! तुम्हाला हव तर तुम्ही नका पाहू, हे अस्त्र फक्त तुमच्याकडे असते. ते अस्त्र तुम्ही इतरांवर नाही थोपवू शकत.

आणि आपल्या अस्त्रांचा, समाज (Bollywood Boycott) माध्यमावरील शिव्या देण्याचा खरच फायदा होतोय की, उलट आपल्यावरच हा बाण उलटतोय हेही ज्याने त्याने तपासून बघण्याची आज गरज निर्माण झाली आहे.

इतकेच

चूकभूल द्यावी घ्यावी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.