Bopkhel: मुळा नदीवरील पुलाच्या कामात अडथळा ठरणारी 502 झाडे तोडणार; अडीच हजार झाडांची लागवड करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे बोपखेल ते खडकीला जोडणारा मुळा नदीवरील पुल बांधण्यासाठी अडथळा ठरणारी 502 झाडे काढण्यात येणार आहे. ही झाडे काढण्यासाठी 62 लाख 97 हजार रूपये संरक्षण विभागाला देण्यात येणार आहे. तसेच या 502 झाडांच्या बदल्यात महापालिकेला संरक्षण विभागाच्या हद्दीत अडीच हजार झाडांची लागवड करावी लागणार आहे.

बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 13 मे 2015 रोजी बंद करण्यात आला. बोपखेल गावासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेमार्फत मुळा नदीवरील पुल ते खडकीतून जाणारा एलफिस्टन रस्ता ते टँक रस्ता पक्क्या स्वरूपात करण्याच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण करण्यात आले. 24 जून 2016 रोजी महापालिकेमार्फत संरक्षण मालमत्ता अधिकारी यांच्याकडे बोपखेल वासियांसाठी मुळा नदीवर पुल व पक्का रस्ता बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला.

संरक्षण मंत्रालयाने काही अटींवर 16 हजार 122 चौरस मीटर संरक्षण खात्याची जागा मुळा नदीवरील पुलासाठी महापालिकेकडे हस्तांतर करण्याची तयारी दाखविली. हस्तांतरीत जमिनीच्या किमती इतकीच जमीन संरक्षण विभागाला महापालिकेने दिली पाहिजे, या प्रमुख अटीसह बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील पुल बांधण्यास संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली.

बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलासाठी संरक्षण विभागाच्या ताब्यातील 16 हजार 122 चौरस मीटर जागेच्या बदल्यात पर्यायी जागा म्हणून संरक्षण विभागाच्या ताब्यातील राज्य सरकारच्या येरवडा येथील 4 हेक्टर 22 गुंठे भुखंडापैकी 25 कोटी 81 लाख रूपये इतक्या सममुल्याची 7 हजार 367.3 चौरस मीटर इतकी जागा प्रदान करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त रस्त्याच्या बांधकामात येणारे संरक्ष्ण खात्याचे विविध गाळे, सीमाभिंत तसेच झाडे यांच्याबाबतही विविध अटींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

या अटींचा विचार करून विविध कामांसाठी 4 कोटी 26 लाख रूपये खर्चास स्थायी समितीने 9 ऑक्टोबर 2018 रोजी मान्यता दिली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 20 जुलै 2019 रोजी या कामाचा आदेश टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा यांना देण्यात आला आहे. सध्या महापालिका हद्दीतील काम प्रगतीपथावर आहे.

रक्षा संपदा अधिकारी राजेंद्र पवार यांनी त्यांच्याकडील संरक्षण मालमत्ता अधिका-यांच्या 13 जानेवारी 2020 रोजीच्या पत्राद्वारे पुलाच्या कामात अडथळा ठरणारी 502 झाडे काढण्यासाठी 62 लाख 97 हजार एवढी रक्कम रक्षा संपदा अधिकारी, पुणे मंडल यांच्या कार्यालयात झाडांची किंमत म्हणून भरावी, तसेच त्या झाडांच्या बदल्यात 2510 झाडांची लागवड संरक्षण विभाग सांगेल त्या जागेत करावी, असे कळविले. 2510 झाडे लावण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे.

महापालिका अर्थसंकल्पात 2019-20 साठी ‘बोपखेल गावासाठी मुळा नदीवर पुल बांधणे’या कामावरील उपलब्ध पाच कोटी एवढ्या तरतुदीमधून झाडांची किंमत देता येणार आहे. त्यानुसार, 62 लाख 97 हजार रूपये थेट पद्धतीने करारनामा न करता देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.