Pimpri: महापालिका खरेदी करुन पीएमपीला बसगाड्या देणार; महासभेची मान्यता 

एमपीसी न्यूज –  बस खरेदी करण्यास दोन वर्षांपूर्वी मान्यता देऊनही पीएमपीएलकडून अद्यापही बस खरेदी केली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर ताण येत आहे. तो कमी करण्याचे कारण देत आता पिंपरी-चिंचवड महापालिका स्वत:  पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) बस खरेदी करुन देणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची तहकूब सभा आज ( बुधवारी) पार पडली.  महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विषयपत्रिकेवरील 13 विषय मंजूर करण्यात आले. एक विषय दफ्तरी दाखल करण्यात आला. तर, दोन विषय तहकूब करण्यात आले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात पीएमपीची बससेवा सुरू आहे. दोन्ही महापालिकांमध्ये पीएमपीसाठी बस खरेदी करण्याचे 60:40 असे प्रमाण ठरले आहे. त्याबाबतचा ठराव 23 ऑगस्ट 2016  रोजी झाला आहे. त्यानुसार 1550  बस खरेदी करण्याचे नियोजन आहे. यापैकी 550  वातानुकूलित बस केंद्र सरकार अंगीकृत असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकिंग (एएसआरटीयु) संस्थेकडून घेण्यात येणार आहेत. दोन्ही महापालिकांमध्ये ठरलेल्या 60:40 धोरणानुसार 100 बस खरेदी करण्यात येणार आहेत. उर्वरित 900  बस महापालिकेने खरेदी करून पीएमपीला द्याव्यात, असा सदस्य प्रस्ताव स्थायी समितीने मान्य करुन महासभेसमोर मंजूरीसाठी ठेवला होता. गेल्या दोन वर्षांत पीएमपीने केवळ 200 बस खरेदी केल्या आहेत.

त्याचा सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यातच उर्वरित बस खरेदीसाठी पीएमपीवर अवलंबून राहिल्यास त्यांच्याकडून आणखी विलंब होऊ शकतो. तो टाळण्यासाठी व प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीच्या मागणीनुसार लेखा विभागाच्या बस खरेदी तरतुदींमधून 900  बस खरेदी करूनपीएमपीला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या विषयाला महासभेने मंजुरी दिली. 

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, बस खरेदीचा विषय सदस्य प्रस्ता वाद्वारे आणला आहे. आयुक्त त्याची अंमलबजावणी करणार आहेत का?  याची माहिती देण्यात यावी. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी देखील त्याला आक्षेप घेतला. 

खुलासा करताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, बस खरेदीचा सदस्य प्रस्ताव आहे. कायदेशीर तपासणी करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.