Bhosari : मैत्रिणीचे लाड पुरविण्यासाठी सोनसाखळीचे गुन्हे करणारा पोलिसांच्या जाळ्यात (व्हिडिओ)

11 गुन्ह्यांची उकल ; साडेसहा लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारा भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पकडला. त्याच्याकडून तब्बल सहा लाख 43 हजार 500 रुपये किमतीचे 159.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एकूण 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. मैत्रिणीचे लाड पुरविण्यासाठी त्याने या मार्गाचा अवलंब केला.

सचिन तुकाराम राजगुरू (वय 27, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 5) एक महिला रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोराने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले. याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथके तैनात केली.

पथकांना माहिती मिळाली की, सचिन हा सोनसाखळी चोर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत आहे . त्यानुसार तपास पथकांनी सापळा रचून सचिन याला पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने 6 सोनसाखळी चोरीचे आणि 5 पर्स चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. यामुळे भोसरी एमआयडीसी, चाकण आणि निगडी पोलीस ठाण्यातील 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून 159.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक ड्युट, एक बुलेट आणि एक पॅशन मोटारसायकल असा एकूण तब्बल सहा लाख 43 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सचिन वेल्डिंगचे काम करीत होता. त्याचे लग्नानंतर चाकण येथील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. यामुळे त्याच्या कामावर वारंवार सुट्ट्या पडू लागल्या. सुट्ट्यांची संख्या वाढल्याने त्याला कामावरून काढून टाकले. त्यामुळे त्याची बायको त्याला सोडून गेली होती. प्रेमसंबंध ठेवलेल्या महिलेचे लाड पुरविण्यासाठी त्याला पैसे कमी पडू लागल्याने त्याने अशा प्रकारच्या चोऱ्या करायला सुरुवात केली. मागील दोन महिन्यात त्याने पिंपरी-चिंचवड शहर परिसरात 11 चोऱ्या केल्या. चोरलेले सोने तो सराफाकडे गहाण ठेवत होता. 5 जुलै रोजी त्याने केलेल्या चोरीच्या घटनेनंतर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

"Zone

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.