Chakan Accident News : राँग साईडने आलेल्या कंटेनरची अनेक वाहनांना धडक; सुदैवाने जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज : विरुद्ध बाजूने (राँग साईड) आलेल्या बेदरकार (Chakan Accident News) अवजड वाहन चालकाने अनेक दुचाक्यांना धडक दिल्याची घटना माणिक चौक ते मुटकेवाडी रस्त्याच्या दरम्यान शुक्रवारी (दि. 9) सायंकाळी घडली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून यात कुणीही जखमी झाले नाही. मात्र, या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी बेदरकार वाहन चालकाला चोप देऊन या मार्गावरून अवजड वाहतूक वळवू नये अशी जोरदार मागणी केली.

चाकणमधील वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी चाकण-शिक्रापूर मार्गावरील शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येणारी सर्व प्रकारची वाहने तळेगाव, मुंबईकडे जाण्यासाठी माणिक चौकातून जुन्या पुणे मार्गाने वळवण्यात येत आहेत. मुटके वाडी ते चाकण दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. असे असतानाही एक अवजड कंटेनर (क्र. एम एच 12 एन एक्स 3533) मुटकेवाडी बाजूकडून चाकण बाजूकडे राँग साईडने भरधाव वेगात आला. रस्त्यालगत उभ्या असलेल्या अनेक दुचाक्यांना व एका बसला या कंटेनरने धडक दिली. यात अनेक दुचाक्यांचे नुकसान झाले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून यात कुणीही जखमी झाले नाही. मात्र, या थरारक घटनेनंतर या भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. या रस्त्यावरून तत्काळ अवजड वाहतूक रोखण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. घटनास्थळी पोहचलेल्या चाकण पोलिसांनी संतप्त नागरिकांना रस्त्यातून बाजूला करत बेदरकार कंटेनरसह चालकास ताब्यात घेतले आहेत.

या रस्त्यावरील अवजड वाहतूक (Chakan Accident News) थांबवण्यासाठी वरिष्ठांना निवेदने देण्यात येणार असल्याचे येथील स्थानिक नागरिक आणि राजकीय पदाधिकार्यांनी सांगितले.

Chakan News : शेतात आढळला महिलेचा अस्थिपंजर सांगाडा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.