Chakan News : चाकणमध्ये ॲग्रो फूडस् शीतगृहातील वीजचोरी उघडकीस ; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चाकण जवळील कुरळीमध्ये एस. एल. ॲग्रो फुडस् शीतगृहासाठी रिमोटद्वारे सुरु असलेली एक लाख रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. मीटरमध्ये वीजवापराची नोंद होऊ नये यासाठी रिमोट बसविल्यानंतर काही तासांमध्ये ही वीजचोरी उघड झाली. याप्रकरणी मदन केशव गायकवाड विरूद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135, 138 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, राजगुरुनगर विभाग अंतर्गत चाकण जवळील कुरुळी (ता. खेड) येथे एस. एल. ॲग्रो फुडच्या शितगृहासाठी महावितरणकडून उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली आहे.

पुणे ग्रामीण चाचणी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी. एन. भोसले यांनी या वीजजोडणीची वार्षिक पाहणी केली असता त्यांना वीजसंचाच्या मांडणीमध्ये संशय आला. त्यांच्यासह राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता संदीप दारमवार, सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांनी वीजयंत्रणेची पाहणी व तपासणी केली. यावेळी वीजवापरकर्ते मदन केशव गायकवाड व पंच उपस्थित होते.

या तपासणीमध्ये शीतगृहातील वीज यंत्रणेत फेरफार करून दोन इलेक्ट्रॉनिक्स किट बसविल्याचे व त्याआधारे रिमोटद्वारे वीजवापराची नोंद होणार नाही अशी तांत्रिक व्यवस्था केल्याचे आढळून आले. वीजचोरी सुरु असल्याचे आढळून आल्यानंतर पंचनामा करण्यात आला व दोन इलेक्ट्रॉनिक्स किट व इतर साहित्य जप्त करण्यात आले. वीजचोरी उघडकीस येण्यापूर्वी 19 तासांच्या कालावधीमध्ये रिमोटद्वारे मीटर मधून वीजवापराची नोंद थांबविण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामध्ये 1 लाख 410 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.