Talegaon Dabhade : चाकण रोड ते एमएसईबी मार्गावरील पथदिवे लागले

जागरूक वाचक कट्टाच्या मागणीला यश

एमपीसी न्यूज – तळेगाव-चाकण रोड ते एमएसईबी कार्यालय या मार्गावर पथदिवे सुरू करण्यात आले नव्हते. त्याबाबत जागरूक वाचक कट्टाच्या वतीने विद्युत विभागाला निवेदन देण्यात आले. विद्युत विभाग व तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्याकडून अवघ्या आठवडाभरात या मार्गावरील पथदिवे सुरू करण्यात आले. यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी रात्रीच्या वेळी सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.

जागरूक वाचक कट्टाच्या वतीने विद्युत विभागाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले होते की, तळेगाव-चाकण रस्त्यापासून महावितरणकडे जाणारा जो रस्ता आहे या रस्त्यावरील पथदिवे सुरू नाहीत. त्यामुळे रस्त्यावर अंधाराचे सावट आहे. या रस्त्यावरून अनेक नागरिक ये जा करत असतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावर पथदिवे बसविणे आवश्यक आहे.

याच परिसरात महावितरणचे कार्यालय आहे. असे असतानाही या भागामध्ये लाईट नाहीत. या भागात अनेक रहिवासी आहेत. लाईट नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. अंधाराचा फायदा घेऊन लुटमार होऊ शकते. नागरिकाच्या सुरक्षेचा विचार करता येथे लाईटची व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हटले होते.

जागरूक कट्टयाच्या या मागणीला यश आले आहे. अवघ्या आठवडाभरात प्रशासनाने दखल घेऊन या रस्त्यावरील पथदिवे सुरू करून परिसरातील राहणा-या नागरिकांसाठी रात्रीच्यावेळी सुरक्षित वातावरण निर्माण केले व नागरिकांची समस्या सोडवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.