Pimpri News: लेखापरीक्षण कामकाजासाठी निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – लेखापरीक्षण कामकाजाची व्याप्ती व अनुभवी कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे लेखापरीक्षण कामकाजावर मर्यादा येत आहेत. या बाबी विचारात घेऊन महापालिकेमार्फत लेखापरीक्षणाचा अनुभव असणाऱ्या तीन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सहा महिने कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्य लेखापरीक्षण विभागामार्फत लेखापरीक्षणाचे काम केले जाते. सध्या कार्यालयामार्फत 2010 ते 2018 दरम्यान विविध विभागांचे लेखापरीक्षण केले जात आहे. तथापि, मार्च 2020 पासून उद्भवलेल्या कोरोनामुळे, तसेच मनुष्यबळाच्या कमतरतेअभावी लेखापरीक्षणाचे काम मागे राहिले आहे. त्याचप्रमाणे लेखापरीक्षण विभागातील प्रचलित पद्धतीनुसार सर्व कार्यालयांचे १०० टक्के लेखापरीक्षण करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत मुख्य लेखापरीक्षण विभागामार्फत लेखापरीक्षणाचे कामकाज सहा गटांमार्फत करण्यात येत आहे.

सध्या 2015 -18 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण सुरू झाले असून, हे कामकाज लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी व कार्यरत कर्मचाऱ्यांची संयुक्त पथके तयार करून लेखापरीक्षण कामकाज प्रगतिपथावर नेण्याचे कार्यालयाचे नियोजन आहे. तथापि, लेखापरीक्षण कामाची व्याप्ती, अनुभवी कर्मचाऱ्यांचा अभाव या बाबी विचारात घेता, तांत्रिक कामाचे लेखापरीक्षण करताना मर्यादा येत आहेत.

याकरिता लेखापरीक्षणाचा अनुभव असणाऱ्या तीन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी लेखापरीक्षणाकरिता मुख्य लेखापरीक्षण विभागात नियुक्ती देण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांमध्ये लेखापरीक्षा अधिकारी किसन साळुंके, लेखाधिकारी राजेंद्र कडू व विशेष लेखापरीक्षक वर्ग-2 आत्माराम माने या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार या अधिकाऱ्यांचे वेतन व भत्ते निश्चित करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.