Chandrakant Patil : एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत भाजपाचे ‘वेट अँड वॉच’चे धोरण

एमपीसी न्यूज : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Chandrakant Patil) यांनी स्वीकारलेल्या भूमिकेमागे भारतीय जनता पार्टीचे कोणतेही नियोजन नाही. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या स्थैर्याबाबत भाजपाचे सध्या ‘वेट अँड वॉच’ अर्थात थांबा आणि वाट पाहा असे धोरण आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केले. ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत आताच मत व्यक्त करणे घाईचे ठरेल. ते शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते आहेत. त्यांची भूमिका व त्यातून निर्माण झालेली परिस्थिती ही त्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे. भाजपाने शिंदे यांना सत्तास्थापनेचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा त्यांच्याकडूनही कोणताही प्रस्ताव आलेला नाही.
ते म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली व महाविकास आघाडीमार्फत सत्ता मिळवली. पण ही अनैसर्गिक युती असल्याने त्यामध्ये शिवसेनेच्या खासदार व आमदारांची घुसमट होत आहे. आगामी निवडणूक आपण भाजपासोबत युतीशिवाय जिंकू शकत नाही, असे अनेकांना वाटते. त्यातून पक्षाच्या नेत्यांची खदखद बाहेर पडणे स्वाभाविक आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन – Chandrakant Patil
त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीचे सर्व पाच उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले. त्यापूर्वी 10 जून रोजी राज्यसभा निवडणुकीतही भाजपाचे सर्व तीन उमेदवार विजयी झाले. या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल रणनितीमुळे भाजपाला विजय मिळाला. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाचा राज्याला पुन्हा एकदा अनुभव आला. आपण प्रदेश भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो.
त्यांनी सांगितले की, अन्य पक्षातील आमदारांनी सद्सदविवेक बुद्धीला स्मरून भाजपाला मतदान केले. त्यांच्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये विजय संभव झाला. त्यांचे आपण आभार मानतो. महाविकास आघाडीच्या आमदारांमधील खदखद आणि असंतोष किती आहे याची या निवडणुकीच्या निमित्ताने चाचणी झाली. भाजपाला या निवडणुकांमध्ये भाजपाला आपल्या 112 या संख्याबळापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे 134 मते मिळाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.