Charholi: च-होलीतील 30 मीटर रस्ता विकसित करण्यासाठी 38 कोटी रुपये 

स्थायी समितीची मंजुरी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांनी च-होलीतील रस्ते विकासावर चांगलाच भर दिला आहे. प्रभाग क्रमांक तीन च-होली परिसरातील रस्ते विकसित करण्यासाठी येणा-या 50 कोटी रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने आज (मंगळवारी)मंजुरी दिली. 30 मीटर डीपी रस्ता विकसित करण्यासाठी तब्बल 38 कोटी रुपये खर्च येणार आहे. 

गेल्या 10 वर्षात केवळ रस्त्यांच्या कामांवर महापालिकेने अब्जावधी रुपयांचा खर्च केला आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनीही रस्तेकामांनाच प्राधान्य दिले आहे. तत्कालीन सत्ताधीशांप्रमाणेच विद्यमान सत्ताधा-यांनी रस्ते विकासावरच भर दिला आहे. गतवर्षी तत्कालीन महापौर नितीन काळजे यांच्या च-होली प्रभागातील रस्ते विकास कामासाठी तब्बल 425 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यांच्या प्रभागातील रस्ते विकासकामांसाठी निधीचा ओघ अद्यापही सुरुच आहे. आज पुन्हा च-होलीतील रस्ते विकास कामासाठी येणा-या 50 कोटी रुपयाला मंजुरी देण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक तीन च-होलीतील सर्व्हे क्रमांक 519 ते 475 पर्यंतचा 30 मीटर डीपी रस्ता विकसित करण्यात येणार आहे. 30 मीटर रस्त्यासाठी तब्बल 38 कोटी 24 लाख 70 हजार 475 रुपये खर्च येणार आहे. हे काम धनेश्वर कन्स्ट्रक्शन यांना देण्यात येणार आहे.  त्याचबरोबर साईमंदिर, कोतवालवाडी, च-होलीगावठाण या परिसरातील रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी दहा कोटी 77 लाख 82 हजार 247 रुपये खर्च येणार आहे. हे काम श्रीगणेश कन्स्ट्रक्शन यांना देण्यात येणार आहे. त्याला स्थायी समितीने आज मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.