Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज –  सर्व धर्माच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी ( Chhatrapati Shivaji Maharaj ) एकत्र आणले. त्यांचे हे सूत्र अतिशय महत्वाचे आहे. प्रजेच्या सुखापुढे स्वतःचे सुख त्यांनी कवडीमोल ठरवले. महाराजांनी हाती तलवार घेतली पण निष्पाप लोकांच्या रक्ताने ती कधीही माखू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. शिवाजी महाराज हे व्यक्ती नाही तर एक रणनीती होती. शिवरायांचा आपण एक तरी गुण अंगीकारावा हीच शिवजयंती साजरी करण्याचे यश असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

किल्ले शिवनेरी येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, शरद सोनवणे, आशा बुचके, विजय घोगरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा करत आहोत. शिवप्रेमी ज्या ज्या देशात आहेत, तिथे शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, धैर्य, त्याग, समर्पण, दूरदृष्टी, सर्वव्यापी हिंदुत्व, युगपुरुष, युगप्रवर्तक. छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्वोत्तम प्रशासक, आदर्श राजा, रयतेचा राजा अशी अनेक रूपे आहेत. ते जेवढे धार्मिक होते तेवढेच ते व्यवहारी आणि विज्ञाननिष्ट देखील होते.

Nigdi : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार मिझोरामच्या शुभान फाउंडेशनला तर राज्यस्तरीय पुरस्कार कोल्हापूरच्या स्वयंसिद्धा संस्थेला घोषित

शिंदे पुढे म्हणाले, नौदलाच्या झेंड्यावर शिवप्रतिमा लावण्यात आली, याचा आपल्याला ( Chhatrapati Shivaji Maharaj ) अभिमान आहे. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जेवढं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आग्रा येथील दिवाण ए आम महालात शिवरायांचा अवमान झाला होता, तिथेच आज आपण शिवरायांची जयंती साजरी करीत आहोत. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. किल्ले संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. दांडपट्टा या शस्त्राला राज्य शस्त्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकार लंडन येथून वाघनखे घेऊन येणार आहे, ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.

जुन्नर हा पर्यटन तालुका आहे. इथे बिबट सफारी सुरु केली आहे. तालुक्यातील 20 पर्यटन स्थळांचा विकास होत आहे. शिवनेरी आणि भीमाशंकर यांना जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. हिरडा पिकाचे नुकसान झाले आहे, त्याबाबत विशेष बाब म्हणून त्याबाबत भरपाई देण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवराय हे युगप्रवर्तक होते. स्वातंत्र्य, स्वराज्य आणि स्वधर्माची शिकवण शिवरायांनी दिली. जोर्पर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत शिवरायांचा जयघोष होत राहील. राज्यातील प्रत्येक विभागीय मुख्यालयात शिवसृष्टी तयार केली जाणार आहे. किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एएसआय संबंधित काही अडचणी येत आहेत, त्याबाबत केंद्राशी चर्चा करून लवकरच यात सुसंगतपणा आणला जाईल. युनायटेड नेशन्समध्ये छत्रपती शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा म्हणून भारताने सादर केले आहेत, ही आनंदाची बाब आहे.”

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “शिवरायांचा विचार हा एकतेचा विचार आहे. यावर्षी शिवरायांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष आहे. त्यानिमित्त भव्य कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसा निर्णय शासनाने घेतला आहे. शिवरायांनी निर्माण केलेल्या सर्व वास्तू जपण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. हेरीटेज वास्तूंचे जतन करण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव परिसरातील आदिवासी बांधवांचे निसर्ग चक्रीवादळात हिरडा पिकाचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे झाले. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्याची भरपाई आदिवासी बांधवांना मिळाली नाही. त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला ( Chhatrapati Shivaji Maharaj ) जाणार आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.