Chikhali : चिखली पोलिसांच्या पाच कारवायात पावणे पाच लाखांचा ऐवज जप्त; सात गुन्ह्यांची उकल

दोन आरोपी आणि सात अल्पवयीन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – चिखली पोलिसांनी जानेवारी महिन्यात एकूण पाच कारवाया केल्या. यामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली तर सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. यांच्याकडून चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एकूण 4 लाख 83 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवायांमुळे चिखली पोलीस ठाण्यातील पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे.

अशोक बबन बहिरट (रा. रुपीनगर, चिखली), सुनील रमेश इब्राहिमपुरकर (वय 19, रा. सिंहगड कॉलनी, अंगणवाडी रोड, मोरेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यासह सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या कारवाईमध्ये जाधववाडी चिखली येथील लाकडाच्या वखारीमागे दोनजण संशयितरित्या थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना एक मोटारसायकलसह (एम एच 14 / बी क्यू 5473) ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ती दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे आणखी कसून चौकशी केली असता त्यांनी पल्सर (एम एच 16 / ए यु 5759) आणि स्प्लेंडर प्लस (एम एच 14 / बी एच 9949) या दोन दुचाकी आणि एक मोबाईल फोन चोरला असल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्याकडून तीन मोटारसायकल आणि एक मोबाईल फोन असा एकूण 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

दुस-या कारवाईत आरोपी अशोक बहिरट याला चिखली मधून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने एक घरफोडी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून 1 लाख 74 हजार रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले.

तिस-या कारवाईमध्ये फुलेनगर येथील मिनी मार्केटमधून दोन संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांनी एक सॅमसंग गॅलक्सी एस 6 मोबाईल फोन चोरला असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 15 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला.

चौथ्या कारवाईमध्ये मोरेवस्ती येथे तीन अल्पवयीन मुले पल्सर कंपनीची दुचाकी घेऊन संशयितरित्या थांबले होते. त्यामुळे त्यांच्याकडे चौकशी करत त्यांची अंगझडती घेतली असता 2 लाख 16 हजार रुपये किमतीचे दहा मोबाईल फोन मिळाले.

पाचव्या कारवाईमध्ये मोरेवस्ती मधून आरोपी सुनील इब्राहिमपुरकर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन हजार रुपयांचा एक मोबाईल फोन जप्त केला. यावरून त्याला अटक करण्यात आली. वरील सर्व कारवायांमध्ये चिखली पोलिसांनी चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीच्या सात गुन्ह्यातील मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा एकूण 4 लाख 83 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) मसाजी काळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बागुल, पोलीस कर्मचारी मंगेश गायकवाड, सुरेश जाधव, राम साबळे, बाबा गर्जे, सुनील शिंदे, चेतन सावंत, अमोल साकोरे, विपुल होले, नरहरी नाणेकर, सचिन गायकवाड, कबीर जारी, सापळाक यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.