Chikhali Crime News : भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडल्याच्या रागातून एकावर तलवारीने वार; पाच जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडल्याच्या रागातून पाच जणांनी मिळून एकावर कोयते आणि तलवारीने वार केले. तसेच फावड्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 12) दुपारी पाटीलनगर, चिखली येथे घडली.

सचिन नितीन गायकवाड, सुरज खपाले, ऋतिक उर्फ मुंग्या रोकडे, विशाल शिंदे, भीमा अशोक कांबळे (सर्व रा. चिखली गाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मारुती बाजीराव मोरे (वय 42, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास विष्णू मोरे असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन गायकवाड आणि फिर्यादी यांचे नातेवाईक गणेश मोरे व अमोल मोरे यांचे भांडण झाले. त्यावेळी फिर्यादी यांचा पुतण्या जखमी विकास मोरे हा भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडला होता. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. विकास मोरे सोमवारी दुपारी साडे पाच वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ असलेल्या बाकड्यावर बसला होता. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपी सुरज खपाले याने ‘माझ्या गॅंग मधील मेंबरला नडतो का’, असे म्हटले. त्यानंतर आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून तलवारी, कोयते दाखवून दहशत माजवली. तसेच विकास मोरे याच्यावर तलवार आणि कोयत्याने वार केले. त्यानंतर फावड्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.