Chikhali : नमाजासाठी गच्चीवर गर्दी; 38 जणांवर शासकीय आदेश भंग केल्याचा गुन्हा

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशपातळीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच एका ठिकाणी गर्दी न करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून नमाजासाठी एका गच्चीवर एकत्र येणाऱ्या 38 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली परिसरात शुक्रवारी (दि. 27) ही घटना घडली आहे. पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गच्चीवर सापडलेल्या 13 जणांवर आणि पळून गेलेल्या त्यांच्या 20 ते 25 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वत्र कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. भारतात देखील त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भारतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात देखील जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी धार्मिक स्थळांवर पूजा करण्यास तसेच एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. आरोपींनी इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतानाही नमाजासाठी गर्दी जमवून सरकारी आदेशाचे उल्लंघन केले आहे.

38 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188, 269, साथरोग प्रतिबंध अधिनियम कलम तीनसह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 57 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.