Pimpri : पाच रुपयात मिळणार शिवभोजन ; प्रत्येक जिल्ह्यात थाळीच्या संख्येत पाचपट वाढ

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये म्हणून राज्यात शिवभोजन थाळी मिळण्याची वेळ एक तास वाढवून सकाळी 11 ते 3 अशी करण्यात आली आहे. तसेच शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येणार असून, राज्यात दररोज 1 लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाने  घेतला आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 5 रुपयांत शिवभोजन मिळणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 

शिवभोजन या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळीसाठी 30 रुपये अनुदान शासन देणार आहे. यासाठी शासनाने 160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये, या उद्देशाने शिवभोजन थाळी पाच रुपये प्रमाणे जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून देण्याचीही सूचना करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 5 रुपयांत शिवभोजन मिळणार असल्याने राज्यातील गोरगरीब जनतेला दिलासा मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.