Chikhali News : ‘कोरोनाची दुसरी लस घेतल्याने तरुणाचा मृत्यू’? नातेवाईकांचा आरोप

एमपीसी न्यूज – कोरोनाची दुसरी लस घेतल्यामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप एका तरुणाने केला आहे. तरुणाच्या भावाचा आज (रविवारी, दि. 3) हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर मयत तरुणाच्या भावाने असा आरोप करत पोलिसांना माहिती दिली.

आकाश विलास कोरे (वय 25, रा. धर्मराजनगर, चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश याने 1 ऑक्‍टोबर 2021 रोजी कोरोना प्रतिबंधक दुसरी लस घेतली होती. लस घेतल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे तो घरीच आराम करीत होता. रविवारी (दि. 3) सकाळी आठ वाजताच्या सुमारास आकाशला जास्तच त्रास होऊ लागल्याने तो घरीच बेशुद्ध झाला.

त्याला उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आकाशचा भाऊ सुरज विलास कोरे याने केला आहे. मात्र आकाशचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.