Chikhali: शरदनगर ते संभाजीनगर या पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 11 मधील शरदनगर ते संभाजीनगर यांना जोडणाऱ्या पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.

महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या पादचारी भुयारी मार्गातील डावीकडे व उजवीकडे दोन्ही बाजूस स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या प्रदर्शन त्या ठिकाणी करण्यात आले आहे.

यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, “या भुयारी मार्गाला स्वामी विवेकानंदांचे नाव देण्यात आले आहे. त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची माहिती नागरिकांपर्यंत जावी यासाठी एकूण 20 म्युरल्स बसविण्यात आले आहेत. स्पाईन रोड परिसरातील समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रयत्न करेल. या परिसरातील नागरिकांसाठी सांस्कृतिक भवन निर्माण करायला हवे” असेही ते म्हणाले.

एकनाथ पवार म्हणाले, “या भुयारी मार्गापूर्वी विदयार्थी व नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे मोठया प्रमाणावर अडचणींना तोंड द्यावे लागत होते. ही गरज ओळखून आम्ही प्रथम या भुयारी मार्गाचे काम प्राधान्याने सुरु केले व एकावर्षात हा प्रकल्प पूर्ण करुन नागरिकासांठी खुला केला आहे. प्रभाग क्रमांक 11 हा स्मार्ट प्रभाग म्हणून आगामी काळात विकसित करण्याचा प्रयत्न आहे”

विलास मडिगेरी म्हणाले, “स्वामी विवेकानंदाच्या तत्वांचा लाभ हा सर्वांसाठी आहे. त्यांचे विचार म्युरल्सच्या माध्यमातून जोपासण्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रयत्न केला आहे” यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “शहर विकसित होत असताना अनेक समस्याही निर्माण होत असतात. नागरिकांना क्रीडांगणे, उदयाने व शाळा यासह विविध सुविधांची गरज असते. पिंपरी-चिंचवड महापालिका त्यादृष्टीकोनातून नियोजन करीत आहे. या भुयारी मार्गाला स्वामी विवेकानंदांचे नाव देण्यात आले आहे. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी ओला व सुका कच-याचे वर्गीकरण करुन दयावे व शहर स्वच्छतेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

शरदनगर, कोयना नगर, संभाजीनगर, स्वामी समर्थ सोसायटी,‍ शिवाजी पार्क येथील नागरिक, वृध्द व लहान मुलांना रस्त्याच्या बाजूस असलेल्या शैक्षणिक संस्था, दवाखाने, सांस्कृतिक सभागृह, प्रशासकीय कार्यालय, इ.ठिकाणे जाण्यासाठी स्पाईन रोड ओलांडून जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना व दुचाकीस्वारांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडण्यास मदत होणार आहे.

या भुयारी मार्गाच्या निर्मितीसाठी सुमारे 5 कोटी 49 लाख रुपये खर्च आला आहे. या भुयारी मार्गाची एकूण लांबी 53 मीटर असून रुंदी 7.00 मीटर आहे व उंची 2.65 मीटर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.