Chinchwad : राज्यात पोलिसांवर 22 दिवसात 72 हल्ले; 161 जणांना अटक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यात मागील 22 दिवसात पोलिसांवर 72 हल्ले झाले आहेत. यामध्ये एकूण 161 जणांना अटक करण्यात आली आहे. समाजाच्या रक्षकावर अशा प्रकारे हल्ले होत असल्याने पोलिसांचे देखील काही प्रमाणात मानसिक खच्चीकरण होत आहे. पण तरीही पोलीस यंत्रणा समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत आहे.

20 मार्च नंतर राज्यात कोरोनाचा कहर जाणवू लागला. त्यामुळे 22 मार्चला राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली. नागरिकांच्या विनाकारण घराबाहेर फिरण्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली आणि संचारबंदीच्या कठोर अंमलबजावणी करू लागली. विनाकारण घराबाहेर फिरताना आढळल्यास पोलिसांनी नागरिकांना विनंती, विनवणी करत, दम, काठीचा प्रसाद देत, प्रसंगी गुन्हे दाखल केले. पण तरीही नागरिक सुधारण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. दररोज शेकडो नागरिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.

मागील 22 दिवसात संचारबंदी आणि शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर भारतीय दंड विधान 188 नुसार राज्यात 38 हजार 647 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दोन हजार 968 जणांना अटक करण्यात आली. विलगिकरण केल्यानंतरही बाहेर फिरताना 497 जण आढळले आहेत. संचारबंदीच्या काळात बेकायदेशीर वाहतूक केल्याबाबत 820 प्रकरणे राज्यात दाखल झाली आहेत.

राज्यभरात पोलिसांनी संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण घराबाहेर फिरणारी 23 हजार 554 वाहने जप्त केली आहेत. सर्व प्रकरणांमध्ये एकूण राज्यभरात एक कोटी 34 लाख 49 हजार 244 रुपयांचा दंड वसूल केला आहे. व्हिसाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 15 प्रकरणे दाखल केली असून त्यात 166 परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यात देखील एक गुन्हा दाखल केला असून त्यात आठ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

एकंदर परिस्थितीत पोलीस रस्त्यावर उतरून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करत आहेत. पोलिसांनी विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना हटकल्यावरून तसेच पास दाखविण्याची विनंती केल्यावरून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. आपण ज्यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र रिस्क घेऊन काम करतोय, पण हेच नागरिक हल्ले करत असलेल्या हल्ल्यांमुळे पोलीस खचत आहेत.

 

पोलिसांवर होणारे हल्ले निंदनीय आहेत. समाजाच्या सेवेसाठी तरीही पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. पोलिसांवर हल्ले झाल्यास गुन्हे दाखल करून संबंधितांना शासन केले जाते. पण नागरिकांनी देखील समजूतदारपणा दाखवायला हवा. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. राजाराम पाटील : सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.