Chinchwad : फूटपाथ अन् रस्त्यावर अतिक्रमण; वाहतूक विभाग-महापालिका प्रशासनाची डोळेझाक, पण लक्षात कोण घेतो…!

श्रीपाद शिंदे

एमपीसी न्यूज – चौकाचौकात कोप-यांवर थांबलेल्या रिक्षा, फूटपाथवर लावलेले इलेक्ट्रिक डीपी, अतिक्रमण यामुळे पादचारी नागरिक सहसा रस्त्यावरून चालताना दिसतात. पादचारी रस्त्यावर आल्याने वाहनांना वाहतुकीसाठी कमी रस्ता मिळतो. यातून वाहतूककोंडी, प्रदूषण आणि परिणामी शहराचे विद्रुपीकरण असे प्रश्न निर्माण होत आहेत. महापालिका प्रशासन, वाहतूक विभाग यांनी याकडे डोळेझाक केली आहे, असे समजते. दोन्ही विभागांचा समन्वय राखून फूटपाथ मोकळे केले आणि चौकाचौकातील रिक्षा थांब्यांना शिस्त लावल्यास हे चित्र पालटेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

चिंचवड येथून पिंपरीच्या दिशेने येताना डी मार्टच्या परिसरात फूटपाथवर हातगाडी आणि पथारीवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. त्यातच डी मार्टच्या चौकात रिक्षाही थांबतात. यामुळे दोन लेनचा असलेला रस्ता आपसूकच एक लेन होतो. सेंट्रल मॉलजवळ फूटपाथवर इलेक्ट्रिक डीपी लावलेला आहे. त्यामुळे तिथूनही पादचारी भर रस्त्यावरून चालतात. तिथे केवळ एक लेन सुरु आहे. त्यातच दुस-या बाजूला मेट्रोचे काम सुरु आहे. त्यामुळे पादचा-यांची मोठी अडचण होते. सेंट्रल मॉलसमोर फूटपाथ काढून तिथे रस्ता बनवला आहे. मात्र, मॉलसमोर मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्किंग होत असल्याने तिथूनही नागरिकांना चालताना अडचणीचं येतात.

पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात स्टेशन रोडला संपूर्ण रस्त्यावर रिक्षा चालकांची अरेरावी सुरु असते. दोन्ही लेनवर रिक्षा थांबतात. त्यातच काही हातगाडी देखील रस्त्यावर थांबतात. चौकातच वाहतूक पोलीस असतात, पण त्यांचे याकडे कधीच लक्ष जात नाही. दोन्ही बाजूंनी रस्त्यावर, फूटपाथवर पार्किंग केल्याने त्यातून जागा मिळाल्यास वाहतूक होते, असे चित्र सतत पाहायला मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून मोरवाडीच्या दिशेने जाणा-या रस्त्यावर, चिंचवड चौकातून चिंचवड गावात जाणा-या रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग केली जाते.

_MPC_DIR_MPU_II

निगडीमधील पवळे उड्डाणपुलापासून लोकमान्य रुग्णालयाकडे जाणा-या रस्त्याच्या फूटपाथवर चौपाटी थाटली जाते. फूटपाथसह अर्धा रस्ता चौपाटीमुळे बंद होतो. याच चौकातून रुपीनगरकडे जाणा-या मार्गावर देखील पार्किंग केली जाते. भोसरी येथे पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या भोसरी उड्डाणपुलाखाली तर, बेकायदेशीर पार्किंगचा गंभीर प्रश्न आहे. दोन्ही बाजूंनी पार्किंग केल्यामुळे भलामोठा रुंद रस्ता अरुंद पाऊलवाट असल्यासारखा भासतो. पीएमटी स्टॉपजवळ रिक्षा आणि खाजगी वाहतूक करणा-या वाहनांची गर्दी असतेच.

काळेवाडी चौक, डांगे चौक, डांगे चौकातून भूमकर चौकाकडे जाणा-या मार्गावर हे चित्र असेच दिसत आहे. वाहतूक पोलीस शेजारीच वाहतूक नियोजन करतात, मात्र त्यांना रस्त्यावर पार्क केलेली वाहने, रिक्षा दिसत नाहीत. फूटपाथ अतिक्रमणाच्या जाळ्यात अडकले आहेत, पण ते महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास येतच नाही. अनेक वृद्ध नागरिक फूटपाथ नसल्यामुळे रस्त्यावरून चालतात. रस्त्यावरून चालताना त्यांचा मोबाईल हिसकावणे, सोनसाखळी हिसकावणे, धक्काबुक्की करणे, वाहनांनी कट मारणे असे अनेक प्रकार घडतात. पण, लक्षात कोण घेतो…? अशी परिस्थिती आहे.

स्थानिक महिला नीरजा माने म्हणाल्या, संबंध शहरातील फूटपाथ अतिक्रमणामुळे झाकले आहेत. पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. भूमिगत रस्ते, रस्त्यापासून काही उंचीवरील फूटपाथ असे काही उपाय यासाठी करता येतील. रिक्षाचालक व वाहतुकीचे नियम मोडणा-यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव म्हणाल्या, “वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास येणा-या सर्व वाहनांवर कारवाई केली जात आहे. सध्या किरकोळ रक्कम भरून वाहन चालक वाहने सोडवून घेतात. वाहने जप्त करण्यासारख्या कारवाया करणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील वाहतुकीची शिस्त बाळगून वाहने पार्क करायला हवीत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.