Chinchwad : सायबर चोरट्यांच्या हाती ‘इझी मनी’चा गळ

एमपीसी न्यूज – सहज पैसे मिळवण्याच्या आमिषापोटी (Chinchwad )शहरातील शेकडोजण सायबर चोरट्यांच्या गळाला लागले आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अनेकपट उत्पन्न मिळते, यातली फसवी बाजू लोकांना सहज लक्षात येत नाही.

सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडून अनेकजण कोणतीही( Chinchwad )शाहनिशा न करता लाखो रुपये गुंतवतात आणि फसवणूक झाल्यानंतर पोलीस ठाण्याचा रस्ता धरतात. शहरातील नागरिकांनी कोट्यावधी रुपये सहज सायबर चोरट्यांच्या हवाली केले असल्याचे फसवणुकीच्या आकडेवारी वरून निदर्शनास येत आहे.

कोट्यावधी रुपये सायबर गुन्हेगारांच्या हातात

हल्ली अनेकांना सहज मिळणारा पैसा हवा असतो. चांगली गुंतवणूक केल्यास त्यातून आर्थिक उत्पन्न सुरु होईल, अशी अनेकांची अपेक्षा असते. मात्र गुंतवणूक करताना सर्व माहिती घेण्याची खबरदारी कोणी घेताना दिसत नाही. थेरगाव येथे एका व्यक्तीला शेअर मार्केट मध्ये आयपीओ मिळवून देतो, असे सायबर भामट्याने आमिष दाखवले. त्यासाठी व्यक्तीकडून 77 लाख रुपये घेत त्याची फसवणूक केली. रहाटणी येथे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीकडून तब्बल 75 लाख रुपये घेतले. शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पिंपळे सौदागर येथे एकाची 38 लाखांची, दुसऱ्याची 36 लाखांची फसवणूक झाली. आयटी पार्क उशाशी असलेल्या मारुंजी मध्ये एका व्यक्तीला 29 लाखांचा गंडा घालण्यात आला. या अवघ्या पाच घटनांमध्ये तब्बल 2 कोटी 55 लाख रुपये सायबर गुन्हेगारांच्या हाती लागले आहेत. अशा शेकडो घटना शहरात घडत आहेत.

उच्चशिक्षितांचे प्रमाण अधिक

आयटी परिसरात राहणाऱ्या तसेच आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चशिक्षितांची सायबर गुन्हेगारांनी सर्वाधिक फसवणूक केली आहे. या आयटीयंसना गुंतवणुकीचे आमिष चांगलेच महागात पडत आहे. आयटीयंससह इतर क्षेत्रातील नागरिकांची देखील फसवणूक होत आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना सर्व कायदेशीर बाबी पडताळून पाहणे गरजेचे असल्याचा सल्ला पोलीस देतात.

पोलिसांसमोर मोठे आव्हान

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मान्यताप्राप्त कंपन्यांसोबत गुंतवणूक केली जाते. या कंपन्यांमध्ये एकच बँक खाते असते. त्याच अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करायचे असतात आणि त्यातून ट्रेडिंग केली जाते. मात्र, जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून काहीजण सायबर चोरट्याच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पेसे भरतात. फसवणूक झालेल्यांचे पेसे सायबर चोरटे पुढे वेगवेगळ्या बँक खात्यात वळवून घेतात. त्यामुळे ही साखळी शोधण्याचे पोलिसांना आव्हानात्मक ठरते. फसवणूक झाल्यावर तक्रारदार २ ते ३ महिन्यांनी तक्रार देण्यासाठी येतात. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

 

Amol Kolhe: अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवनेरी किल्यावर भेट

व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून आमिष

सायबर चोरटे टेलिग्राम, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफार्मवरून गुंतवणूक करण्याबाबतच्या पोस्ट शेअर करतात. तसेच व्हाट्सअपवरून ग्रुप तयार करून त्यामध्ये नवनवीन लोकांना सहभागी करून घेतले जाते. या ग्रुपमध्ये सायबर चोरट्यांचेच आठ ते दहा साथीदार ॲडमीन असतात. त्यांच्याकडून सातत्याने ग्रुपमध्ये बनावट पोस्ट शेअर केल्या जातात. आज मला खूप नफा झाला, अशा आशयाचा मजकूर सातत्याने ग्रुपमध्ये नमूद केला जातो. ग्रुपमधील नवीन सदस्यांना देखील अशा मेसेज मधून गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले जाते.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर मार्केट आणि ट्रेडिंग कशा पद्धतीने होते, याबद्दल सखोल माहिती घेतली पाहिजे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी मान्यताप्राप्त ब्रोकर्स, सल्लागार किंवा ऑनलाइन स्रोतांद्वारे दिली गेलेली कोणतीही माहिती दोनदा तपासली पाहिजे. उच्च परताव्याची हमी देणाऱ्या योजना या गुंतवणूकदारांना फसविण्यासाठी असतात. सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ डॅंडिया (एसइबीआय) या भारतीय नोंदणीकृत वेबसाइटवरून शेअर मार्केटबद्दल माहिती मिळते.

आधी शिकवण्याचा बहाणा मग कोटींचा गंडा

– सोशल मीडियावर एखाद्या ग्रुपमध्ये किंवा पोस्टच्या माध्यमातून ओळख केली जाते.

– शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास शिकवण्याचा बहाणा केला जातो.

– गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे बनावट वेबसाइटव्दारे भासविले जाते.

– शेअर्स आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा आहे, असे आमिष दाखवून पैसे भरण्यास भाग पाडले जाते.

– फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत बराच कालावधी निघून गेलेला असतो.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.