Chinchwad : एटीएम सुरक्षेबाबत पोलिसांच्या सूचनांचे पालन न केल्यास बँकांवर होणार कारवाई

एटीएम चोरी गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या बँकांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात एटीएम फोडण्याचे प्रयत्न, एटीएम चोरीचे गुन्हे वारंवार घडत आहेत. चाकण येथे स्कॉर्पिओमधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम पळवून नेले. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस आयुक्तांनी रविवारी (दि. 15) पोलीस अधिका-यांची तर सोमवारी (दि. 16) बँकेच्या अधिका-यांची बैठक घेतली. एटीएमच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी घालून दिलेल्या निकषांचे पालन बँकांनी केले नाही तर बँकांच्या संबंधित अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. अशी बँक अधिका-यांच्या बैठकीत आयुक्तांनी बँकांना सक्त सूचनावजा ताकीद दिली.

बँकांकडून एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी त्रयस्थ संस्थांना दिली जाते. त्यातच विम्याचे पॅकेजची बक्कळ असते. त्यामुळे एटीएम चोरी झाले अथवा फोडण्याचा प्रयत्न झाल्यास बँकांना त्याची भरपाई सूत समेत परत मिळते. केवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायचा आणि बाजूला व्हायचे. गुन्हा दाखल केल्याचे विमा कंपन्यांना दाखवल्यास विम्याची रक्कम बँकांना मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. मात्र, याचा मनस्ताप पोलिसांना होतो. हे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून बँका याबाबत कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत.

मागील दोन महिन्यांच्या कालावधीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 13 एटीएम फोडी आणि फोडण्याचा प्रयत्नाचे प्रकार घडले आहेत. या एकही प्रकारात एटीएम फोडताना अलार्म वाजला नाही. त्यामुळे घटनांची माहिती परिसरात तसेच पोलिसांना मिळाली नाही. चोरटे पसार झाल्यानंतर पोलिसांना माहिती मिळते. शहरात सुमारे दोन हजार एटीएम आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला सध्या मनुष्यबळ कमी असल्याने या सर्व एटीएमवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. बँकांनी एटीएमच्या सुरक्षेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.

एटीएमच्या परिसरात दर्शनी भागासह ठराविक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असावेत. अनेक एटीएममध्ये दर्शनी भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात नाहीत. असावा म्हणून एखादा कॅमेरा आतल्या बाजूला लावला जातो. त्यामुळे एटीएमच्या बाहेर येणा-या जाणा-या नागरिकांची ओळख पटत नाही. प्रत्येक एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक असायला हवा. एटीएमशी छेडछाड झाल्यास अलार्म वाजायला हवा. ज्यामुळे ती माहिती बँकेला, पोलिसांना मिळेल. एटीएम मशीन बसवताना पक्के फाऊंडेशन असावे. चाकण येथे झालेल्या एटीएम चोरीच्या घटनेत एटीएम केवळ काही स्क्रूवर बसवलेले होते.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले, “बँकांनी एटीएमच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. बँकांच्या निष्काळजीपणामुळे पोलिसांचे काम वाढत आहे. बँकांना वारंवार सांगूनही त्यांच्याकडून त्यावर कारवाई केली जात नाही. यापुढे एटीएम फोडीच्या घटनेनंतर बँकांकडून दाखल होणा-या गुन्ह्यांपेक्षा बँकांवर कारवाई केली जाणार आहे. एफआयआर देदो, इन्शुरन्स लेलो अशी बँकांची मानसिकता आहे. ही मानसिकता बदलायला हवी.

…तर बँकांवर होणार कारवाई
पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन बँकांनी केले नाही आणि त्याच बँकेच्या एटीएममध्ये चोरीची अथवा चोरीच्या प्रयत्नाची घटना घडल्यास संबंधित बँकांवर भारतीय दंड संहितेच्या 188 प्रमाणे कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे बँका ज्या त्रयस्थ संस्थांसोबत सुरक्षेचा करार करतात, त्यांना बँकांनी सक्त सूचना देण्याची प्रसंगी करार रद्द करण्याची गरज आहे.

विकेंडलाच होतात एटीएम फोडीच्या घटना
शनिवारी आणि रविवारी बहुतांश कंपन्या, कार्यालये आणि बँकांना सुट्टी असते. त्यामुळे बँका शुक्रवारी संध्याकाळी एटीएममध्ये पैसे भरतात. चोरटे अशा वेळी संधी साधून एटीएम चोरी करतात. यामुळे चोरट्यांना भली मोठी रक्कम मिळते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.