Chinchwad : आगीच्या ज्वाळात वितळून गेले प्लास्टिकचे संसार !

चिंचवडमधील अग्नितांडवात सहा झोपड्या जाळून खाक; दोघांचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज – चिंचवड मधील दळवीनगर झोपडपट्टीमध्ये आज (गुरुवारी) पहाटे अचानक आग लागली. या आगीमध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर सहा संसार पूर्णतः बेचिराख झाले. जळालेल्या घरांमध्ये बहुतांश प्लास्टिकचे सामान असल्याने प्लास्टिकचे हे संसार वितळून गेले आहेत. दिवाळी दहा दिवसांवर आली असल्याने काही घरांमध्ये दिवाळीचे फराळ करण्यास दोन दिवसात सुरुवात करायची होती, पण आता घरच जळून गेल्यामुळे दिवाळीचे संपूर्ण नियोजन रद्द करून संसार उभा करण्यासाठी नियोजन सुरु आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुरुवातीला लागलेली आग एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने पसरली आणि आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीमध्ये संजय क्षीरसागर, प्रदीप मोटे, मसा जाधव, शंकर पांचार, हरी मनोहर, रवी वाघमारे यांची घरे जळून गेली आहेत. तर शंकर आणि प्रदीप यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.

“संजय क्षीरसागर यांच्या घरात यल्लम्मा देवीचे मंदिर आहे. ते यल्लम्मा देवीचे निस्सीम भक्त होते. देवीची पूजा, सेवा करण्यात त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवले. पण रात्री अचानक लागलेल्या आगीत त्यांचाच मृत्यू झाला. देवीचा संपूर्ण साज काढून ठेवला होता. तो साज आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने देवीचा साज आणि मंदिर पूर्ण बेचिराख झाले. याच आगीत प्रदीप मोटे याचाही मृत्यू झाला.” असे त्यांचा शेजारी रवी वाघमारे याने सांगितले.

रवी चिंचवड मधील एका खाजगी कंपनीत काम करतो. घटना घडली त्यावेळी तो नाईट शिफ्टमध्ये कंपनीत काम करत होता. रवी म्हणाला, “जळालेल्या सहा घरांमध्ये एकूण 27 लोक राहत होते. माझ्या घरात एकूण आठ लोक राहतात. माझ्या घराच्या दोन खोल्या असून एका खोलीत पत्नी आणि मुले झोपतात तर एका खोलीत वडील झोपतात. रात्री वडील झोपलेल्या खोलीला आग लागली. आगीच्या ज्वाळा बघून वडील कसेबसे बाहेर पडले. त्यानंतर पत्नीने मला फोन केला. घटना ऐकल्यावर सुरुवातीला धक्का बसला. पण बळ एकवटून पत्नीला विचारले बाबा कसे आहेत? मुले कशी आहेत?”

“मी महापालिकेच्या कच-याच्या गाडीवर काम करतो. काम करत असताना लहान सहान प्लास्टिक मी घरात जमा करून ठेवतो. वर्षभर जमा झालेले प्लास्टिक प्रत्येक दिवाळीच्या अगोदर विकतो. येणा-या पैशातून नातवांना कपडे आणि फटाके घेतो. हा रिवाज मागील काही वर्षांपासून सुरु आहे. या वर्षीचे देखील नियोजन झाले होते. दोन-चार दिवसांनी वर्षभर जमा केलेले प्लास्टिक विकणार होतो. त्यातून नातवांना कपडे आणि फटाके घेणार होतो. पण अचानक लागलेल्या आगीत प्लास्टिक सोबत नातवांचा आनंद वितळून गेल्याचे दुःख रात्रीपासून बोचत आहे” रवीचे वडील अनंत वाघमारे भावुक होऊन सांगत होते.

“मला तीन मुली आणि एक मुलगा आहे. मुलांचा एकत्र अभ्यास होत नाही म्हणून दोन मुलींना आजीच्या घरी अभ्यासासाठी पाठवले होते. अभ्यास झाल्यानंतर मुली आजीसोबत झोपल्या. रात्री अचानक आग लागली आणि प्रचंड गोंधळ झाला. घरातून बाहेर येऊन बघितले तर आईचे घर पूर्ण जळून गेले होते. मनात शंकेची पाल चुकचुकली, हातापायातील अवसान गळून गेले. अंगाचा थरकाप सुटला. पण अचानक मोठ्याने ‘आई’ म्हणत दोन्ही मुलींनी मिठी मारली. मुलींचा आवाज आणि स्पर्श होताच जीवात जीव आला आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. तरीही दुःख कमी झाले नव्हते. अजूनही आई दिसत नव्हती. मुलींना कुरवाळत नजर आईलाच शोधत होती. काही वेळ जाताच आई दिसली.” असे डोळ्यात पाणी दाटलेल्या मंगल मारुती सोनवणे सांगत होत्या.

मंगल यांच्या आईच्या घरी त्यांच्या आई-वडील आणि भाऊ असे तिघेजण राहतात. त्यांचे वडील हरी मनोहर गावाकडे दुःखद घटना घडल्याने लातूर जिल्ह्यातील तावशी या गावी गेले होते. रात्री घरी आई, भाऊ आणि मंगल यांच्या निकिता सोनवणे (इयत्ता अकरावी) आणि नेहा सोनवणे (इयत्ता सातवी) या दोन मुली होत्या.

“घराच्या मागच्या बाजूने आग लागली. पत्रा पूर्ण लाल झाला होता. घरातील आडू पेटले होते. अचानक निकिताला जाग आली. तिने मामाला जागे केले. त्यानंतर आजीला जागे केले. दोघांची घर वाचवण्यासाठी धडपड सुरु झाली. निकिताने नेहाला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु नेहा गाढ झोपेत असल्यामुळे ती उठली नाही. म्हणून तिला उचलून घराबाहेर घेऊन गेलो” असे निकिता आणि नेहाचा मामा गणेश मनोहर सांगत होता.

“आजीच्या घरात आम्ही अभ्यास करायचो. त्यामुळे आमची वह्या-पुस्तके आजीच्या घरात ठेवली होती. या आगीत वह्या-पुस्तके देखील जळून गेली आहेत” अकरावीत शिकणारी निकिताने सांगितले.

झोपडपट्टीमध्ये अगदी सर्वसामान्य लोक राहतात. तांब्या पितळेची भांडी त्यांच्याकडे नसतात. त्यांचा बहुतांश संसार प्लास्टिकच्या भांड्यावर चालतो. सर्व घरांमध्ये तांदूळ, बाजरी, गहू, ज्वारी, पीठ अन्य किराणा सामान प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवले होते. आगीच्या तांडवात सर्व भांडी-डबे जळाल्याने किराणा सामान भाजून अस्ताव्यस्त पडले आहे. वाचलेल्या लोकांच्या अंगावरील कपडे तेवढे सुरक्षित असून सगळा संसार मातीमोल झाला आहे. आता हा संसार सर्वांना पुन्हा उभा करावा लागणार आहे. दिवसभर बघ्यांची गर्दी होत आहे. नातेवाईक आणि मित्रमंडळी भेटून, विचारपूस करून जात आहे. आणि तिथला प्रत्येकजण हीच कहाणी सांगत आहे.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.