Chinchwad : चिंचवड रेल्वे स्थानकावर आई आणि मुलींची ताटातूट; रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे कुटुंबाची पुन्हा भेट

एमपीसी न्यूज – चिंचवड रेल्वे स्थानकावरून (Chinchwad) सिंहगड एक्सप्रेस मध्ये चढताना आईने आपल्या दोन लहान मुलींना चढवले. मात्र गर्दीमुळे आई रेल्वेत चढू शकली नाही. हा प्रकार लक्षात येताच रेल्वे पोलिसांनी लोणावळा येथे दोन्ही मुलींना ताब्यात घेतले. पाठीमागून लोकलने आलेल्या आईच्या दोन्ही मुलींना ताब्यात दिले. रेल्वे पोलिसांनी केलेल्या या मदतीमुळे मुलींच्या पालकांना आनंदाश्रू अनावर झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी सकाळी सिंहगड एक्सप्रेस चिंचवड स्थानकावर आली. दिवाळी सणामुळे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. एक महिला आपल्या दोन लहान मुलींना घेऊन मुंबईला जात होते. चिंचवड रेल्वे स्थानकावर सिंहगड एक्सप्रेस आल्यानंतर महिलेने आपल्या दोन्ही लहान मुलींना अगोदर रेल्वेत चढवले. त्याचवेळी इतर प्रवाशांची रेटारेटी सुरूच होती. त्यामुळे महिला रेल्वेत चढू शकली नाही.

अवघ्या काही क्षणांचा थांबा असल्याने रेल्वे चिंचवड स्थानकातून सुटली. रेल्वे सुटताच महिलेने रेल्वे स्थानकावर एकच आवाज केला. मुली रेल्वेत असल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच चिंचवड रेल्वे पोलिसांनी महिलेला शांत करून मुलींची माहिती घेतली. ही माहिती लोणावळा रेल्वे स्थानकावर कळवण्यात आली. तेथील रेल्वे पोलिसांनी रेल्वेच्या डब्यात जाऊन दोन्ही मुलींना ताब्यात घेतले.

PCMC : ‘त्या’ सूचनांचाच होणार अंदाजपत्रकात समावेश

दरम्यान, पुणे-मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेसने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही माहिती समजली. त्यांनी संबंधित डब्यात (Chinchwad) जाऊन मुलींची विचारपूस केली. मुलींची समजूत काढून त्यांना शांत केले. पाठीमागून तुमचे पालक येत असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर दोन्ही मुलींना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सिंहगड एक्सप्रेसच्या पाठीमागून आलेल्या लोकलने आईने लोणावळा गाठले. स्टेशन मास्तरांच्या केबिन मध्ये मुलींना बसवण्यात आले होते. आईला पाहताच मुलींनी आईकडे धाव घेत घट्ट मिठी मारली. आईने रेल्वे पोलिसांचे आणि नागरिकांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.