Lonavala : स्मृतिभ्रंश झाल्याने वृद्ध महिला रेल्वेतून भरकटली

एमपीसी न्यूज – स्मृतिभ्रंश होण्याचा आजार असलेली (  Lonavala ) वृद्ध महिला कुटुंबासोबत रेल्वेने प्रवास करत असताना लोणावळा रेल्वे स्थानकावर उतरली आणि भरकटली. याबाबत महिलेच्या मुलाने कल्याण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

राजमती बाबुराव कदम (वय 75, रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई. मूळ रा. बामणी, ता. वाळवा, जि. सांगली) असे भरकटलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण बाबुराव कदम (वय 51) यांनी कल्याण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी प्रवीण आणि त्यांचे कुटुंबीय मूळ गावी पुतण्याच्या श्राद्धासाठी गेले होते. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी ते सांगली ते मुबई असा हुबळी-दादर एक्सप्रेसने स्लीपर कोच मधून प्रवास करत होते.

Chinchwad : चिंचवड रेल्वे स्थानकावर आई आणि मुलींची ताटातूट; रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे कुटुंबाची पुन्हा भेट

6 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता ते सांगली रेल्वे स्थानकावरून रेल्वेत बसले. त्यानंतर रेल्वे पहाटे सव्वातीन वाजता पुणे रेल्वे स्थानकावर आली. तिथे काही प्रवासी उतरले. त्यावेळी खालचे सीट रिकामे झाल्याने प्रवीण यांनी आईला मधल्या सीटवरून खालच्या सीटवर झोपण्यासाठी जागा करून दिली.

त्यानंतर प्रवीण देखील झोपी गेले. सकाळी साडेपाच वाजता त्यांना कर्जत रेल्वे स्थानकावर जाग आली. त्यावेळी त्यांची आई राजमती या त्यांच्या जागी नव्हत्या. प्रवीण यांनी त्यांची रेल्वेच्या डब्यात शोधाशोध केली. सहप्रवाशांकडे चौकशी केली. मात्र आईचा कुठेही शोध लागत नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली.

राजमती बाबुराव कदम. वय 75 वर्ष. उंची पाच फूट तीन इंच. अंगाने सडपातळ. रंग सावळा, नाक सरळ, चेहरा गोल, डोक्याचे केस आखूड व पांढरे, नेसणीस गुलाबी रंगाची साडी घातली आहे.

या वर्णनाची महिला लोणावळा रेल्वे स्थानकावर उतरली असून ती महिला लोणावळा परिसरात फिरत असल्याचे म्हटले जात आहे. वरील वर्णनाच्या महिलेबाबत माहिती मिळाल्यास लोणावळा पोलिसांशी (9821596533) तसेच त्यांचा मुलगा प्रवीण कदम (8652480644/9820347819) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात (  Lonavala ) आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.