Chinchwad News : दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन; मूर्तीदान करण्यावर भर, घाटांवर शुकशुकाट

एमपीसी न्यूज – दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचे आज (रविवारी) विसर्जन करण्यात आले. गणेश मूर्तींचे नदीत विसर्जन न करण्यावर बंदी घातल्याने गणेश मूर्ती दान करण्यावर यावर्षी भर देण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी कृत्रिम हौद तयार करण्यात आले असून गणेश मूर्तीचे  विसर्जन करून नंतर मूर्ती स्वयंसेवी संस्थेकडे जमा केली जात आहे.

कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून गणपती विसर्जन नदी पात्रात करण्याची परंपरा मोडीत काढून गणेश विसर्जन सरकारी नियमानुसार कृत्रिम हौदात करून मूर्ती दान करण्यावर भर देण्यात आला.

चिंचवड मध्ये संस्कार प्रतिष्ठान मार्फत घाटावर कृत्रिम हौद व मूर्ती घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी घरगुती गणपतीचे हौदात विसर्जन करून मूर्ती जमा करून घेतली जात आहे. नदी घाटावर गणपती विसर्जन करण्यासाठी बंदी असल्यामुळे घाटावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. विसर्जन करण्यास आलेल्या गणेश भक्तांना गर्दी न करण्याचे आवाहन केले जात असून याठिकाणी शिस्तबद्ध विसर्जन होताना पाहायला मिळाले.

चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिराजवळील पवना नदीच्या घाटावर गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी एक महानगरपालिका पदाधिकारी व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविक या ठिकाणी गर्दी टाळत आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देत आहेत. नदीत विसर्जन करण्यासाठी बंदी असल्यामुळे नदीघाटावर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. या ठिकाणी ठेवलेल्या कृत्रिम हौदात डिटर्जंट मिश्रित पाणी ठेवण्यात आले असून त्यामध्ये गणेश मूर्ती विसर्जित करून पुढे ती गाडीत जमा केली जाते.

संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी संस्कार प्रतिष्ठान मार्फत शहरात ठिकठिकाणी चार गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोसायटी तसेच काॅलनीमधील गणेश भक्त विसर्जनासाठी गाडी बोलावून घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. या साठी ठिकठिकाणाहून संपर्क करून भाविक मूर्ती दान करत आहेत.

शहरातून जमा केलेल्या गणेश मूर्तीचे वाकड येथील विनोदे वस्तीच्या तळ्यात विधिवत विसर्जन केले जाणार जाते व यासाठी वेगळी टिम नेमण्यात आली आहे. विसर्जनावेळी जमा करण्यात आलेले जवळपास एक टन निर्माल्य देखील जमा करण्यात आले आहे. गणपती विसर्जनाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी देखील विसर्जनासाठी ही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

संस्कार प्रतिष्ठान गेली पंधरा वर्षांपासून गणेश विसर्जनासाठी ही सुविधा उपलब्ध करून देत आहेत. गणेश भक्तांनी विसर्जनासाठी येत असताना शक्यतो एकाच व्यक्तीने यावे तसेच, लहान मुले व वृद्ध नागरिकांनी या ठिकाणी येण्याचे टाळावे. गणेश भक्तांनी  घरातच मूर्तीचे विसर्जन करण्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन गायकवाड यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.