Chinchwad : तळवडे आग दुर्घटना; मृत महिलांचे डीएनए चाचणी अहवाल प्राप्त, सहा महिलांवर एकाच वेळी होणार अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज – तळवडे येथील स्पार्कल कँडल बनिवणाऱ्या कंपनीत (Chinchwad )शुक्रवारी (दि. 8) दुपारी स्फोट होऊन सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत असल्याने मृत झालेल्या सहा महिलांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे ‘डीएनए’ सॅम्पल चाचणीसाठी पाठवण्यात आले.

डीएनए चाचणी अहवाल रविवारी सायंकाळी आले असून त्याद्वारे मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आहे. सर्व मृतदेह सोमवारी (दि. 11) सकाळी नऊच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

तळवडेतील ज्योतिबानगर येथील शिवराज एंटरप्रायजेस (Chinchwad )या कंपनीत बेकायदेशीरपणे ‘स्पार्कल कँडल’ बनविण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून स्फोट झाला. यात सहा मजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला. मोठ्या तीव्रतेचा स्फोट असल्याने मृत महिलांच्या शरीराचा अक्षरश: कोळसा झाला. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. नातेवाईकांनाही त्यांची ओळख पटत नव्हती. त्यामुळे मृत सहा महिलांचे तसेच त्यांच्या नातेवाईकांचे असे एकूण 12 नमुने डीएनए चाचणीसाठी शनिवारी पुणे येथील न्याय वैद्यकीय सहाय्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते.

Ind-SaT-20 :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द

प्रयोगशाळेत एका डीएन चाचणीसाठी सुमारे 18 तास लागतात. त्यामुळे सहा महिलांचे डीएनए आणि त्यांच्या सहा नातेवाईकांचे डीएनए यांची चाचणी घेऊन त्याचा अहवाल प्राप्त होण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली होती. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहवाल लवकर उपलब्ध करून देण्यात आले.

डीएनए अहवाल आला नसल्याने त्या महिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले नव्हते. मयत सहा महिलांचे मृतदेह पिंपरी येथे वायसीएम रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवले आहेत. मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागली. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने कोणता मृतदेह कोणत्या नातेवाईकांच्या ताब्यात द्यायचा, यावरून अत्यंत भावनिक पेच प्रशासनासमोर उभा राहिला होता. त्यानंतर सर्व मृतदेह आणि संबंधित नातेवाईकांची डीएनए चाचणी करण्यात आली.

त्यांचा ‘डीएनए’ अहवाल रविवारी सायंकाळी प्राप्त झाला. मात्र, मृतदेह सोमवारी सकाळी नऊच्या सुमारस नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्यानंतर सहा मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=Mve9E84PM2M&t=3s&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.