Pune : पुणे जिल्हा उद्योग वाढीसाठी पोषक; अनेक कंपन्या पुण्यात येण्याच्या प्रतीक्षेत

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा उद्योग वाढीसाठी पोषक ठरू लागला आहे. अनेक ( (Pune ) कंपन्या नव्याने पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे इथल्या लघु उद्योगांना चांगले दिवस येतील, असे म्हटले जात आहे. असे असले तरी काही औद्योगिक वसाहतींमधील भूखंड हा रहिवासी म्हणून दिला जात असल्याने उद्योग वाढीसाठी हे अडचणीचे ठरणार आहे. खंडेनवमीच्या निमित्ताने शहरातील उद्योगांच्या विविधांगांचा आढावा .

Pune : भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  ‘ शिवप्रिया ‘ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे जिल्ह्यात एकूण सुमारे 25 हजार पेक्षा अधिक लहान, मोठे उद्योग आहेत. त्यामध्ये वाहन निर्मिती, सुट्या भागांची निर्मिती, रासायनिक पदार्थ, औषध निर्मिती, कृषी आधारित आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित उद्योग इथे आहेत. त्यापैकी सुमारे 13 हजार 500 लघु आणि मध्यम उद्योग हे पिंपरी-चिंचवड शहर परिसरात आहेत. पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पिंपरी, चिंचवड, भोसरी, चाकण, तळेगाव एमआयडीसी, तळेगाव फ्लोरिकल्चर, तळवडे आयटी पार्क, हिंजवडी आयटी पार्क अशा औद्योगिक वसाहती आहेत.

मोठ्या उद्योगांना पोषक वातावरण, मोठ्या उद्योगांना पुरवठा करणारे लहान उद्योग यांचे जाळे शहरात मुबलक आहे. त्यामुळे अनेक उद्योग शहराकडे आकर्षित होतात. असे असले तरी पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक औद्योगिक भूखंड रहिवासी म्हणून दिले जात आहेत. एखादी कंपनी शहरातून गेल्यानंतर त्या कंपनीचा भूखंड अशा प्रकारे रहिवासी इमारती बांधण्यासाठी दिला जात आहे. त्यामुळे शहरात उद्योगांच्या बाबतीत सगळंच (Pune ) चांगलं आहे, असे नाही.

पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, “लघु आणि मध्यम उद्योजक स्वतःच उद्योग चालवतात. त्यामुळे त्यांना कुणावर अवलंबून राहावे लागत नाही. मागील काही दिवसात स्टीलचे भाव देखील स्थिर असल्याने उत्पादन खर्च देखील स्थिर आहे. यामुळे लहान उद्योग शहरातून बाहेर जात नाहीत. आगामी काळात शहरात काही उद्योग येण्याची चिन्हे आहेत. हे उद्योग शहरात आल्यास इथे आणखी लघुउद्योग उभा राहतील.”

तो उद्योग गुजरातला पळवला
वेदांत फॉक्सकॉन ही कंपनी तळेगाव एमआयडीसी येथे येणार होती. या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात सेमी कंडक्टरचे उत्पादन केले जाते. कंपनी येणार असल्याने तळेगाव परिसरातील तरुणांना रोजगार मिळण्याचे मोठे साधन मिळणार होते. पण अचानक ही कंपनी गुजरात येथे जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झाले. पण यामुळे स्थानिक तरुणांचे मोठे नुकसान झाले.

लाखो कामगारांची कर्मभूमी
पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील एमआयडीसी, आयटी पार्कमध्ये नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशभरातून लाखो युवक आले आहेत. या लाखो युवकांची ही कर्मभूमी आहे. मात्र मागील काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेश येथून आलेले कामगार पुन्हा आपल्या राज्यात गेले आहेत. सध्या शहरात झारखंड, बिहार येथील कामगार सर्वाधिक आहेत. राज्यातील कामगारांच्या तुलनेत इतर राज्यातील कामगारांची संख्या अधिक आहे.

जनरल मोटर्स गेली पण
तळेगाव एमआयडीसी मधील आणखी एक कंपनी जनरल मोटर्सने आपला गाशा गुंडाळला. यामुळे कंपनीतील हजारो कामगार रस्त्यावर आले. जनरल मोटर्स या कंपनीच्या जागेवर ह्युंदाई कंपनी येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, काही कामगारांनी जनरल मोटर्स कंपनी देईल तेवढा मोबदला घेतला. पण अद्याप हजार पेक्षा अधिक कामगार ‘आम्हाला कामाच्या बदल्यात काम द्या’ या मागणीसाठी उपोषणाच्या मार्गावर बसले आहेत.

जनरल मोटर्स मधून आमचे विस्थापन नव्याने येणाऱ्या ह्युंदाई कंपनीत करा, अशी या कामगारांची मागणी आहे. सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून देखील सरकारने याबाबत कोणतीही निर्णायक भूमिका अद्याप घेतलेली नाही. हे कामगार मागील तीन आठवड्यांपासून साखळी उपोषण करीत आहेत.

जनरल मोटर्स एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष संदीप भेगडे म्हणाले, “खंडेनवमी सारखा आनंदाचा सण असताना आम्हा हजारो कामगारांना उपोषण करावे लागत आहे. कामगारांना अशा बिकट परिस्थितीत सरकारने टाकले आहे. आमच्या आंदोलनाला तीन आठवडे झाले मात्र अद्याप सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.”

अनेक उद्योगांची पुणे परिसराला पसंती
देशात येणारे अनेक उद्योग पुणे परिसराला पसंती देतात. पुणे जिल्ह्याला देशभरातून चांगली कनेक्टिव्हीटी मिळाली आहे. पुणे रेल्वे स्टेशन, जेएनपीटी बंदर, पुणे विमानतळ, मुंबई विमानतळ आदींच्या माध्यमातून जगभर पोहोचण्यासाठी उद्योगांना मदत होते. जेएनपीटी बंदर हे जगातील प्रमुख 30 बंदरांपैकी एक आहे. आता नवी मुंबई विमानतळ देखील सुरु झाल्याने त्याचाही उद्योगांना फायदा होत आहे.

पुणे-मुंबईला जोडणारा द्रुतगती मार्ग हा खऱ्या अर्थाने उद्योगांना समृद्धी प्रदान करणारा ठरत आहे. पुणे येथून शेजारील राज्यांना देखील चांगली कनेक्टिव्हीटी आहे. टपाल विभागाने देखील उद्योगांशी भागीदारी करून माफक दरात माल पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वीज, पाणी, कनेक्टिव्हीटी, बुद्धिमत्ता आणि कौशल्य, नैसर्गिक गॅस, अग्निशमन सेवा अशा इतर पायाभूत सुविधा देखील उपलब्ध असल्याने उद्योजक पुणे परिसरात येण्यास पसंती देतात.

पुणे जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वसाहती
चाकण एमआयडीसी फेज एक, चाकण एमआयडीसी फेज दोन, चाकण एमआयडीसी फेज तीन, चाकण एमआयडीसी फेज चार, बारामती एमआयडीसी, इंदापूर एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी फेज एक, तळेगाव एमआयडीसी फेज दोन, तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क, जेजुरी एमआयडीसी, कुरकुंभ एमआयडीसी, भिगवण एमआयडीसी, खराडी नॉलेज पार्क, खेड सेझ, राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज एक हिंजवडी, राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज दोन हिंजवडी, राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज तीन हिंजवडी, तळवडे सॉफ्टवेअर (Pune ) पार्क.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.