Chinchwad crime News : चाकण ड्रग्ज प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – चाकण एमडी ड्रग्ज प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भला मोठा तपास केला आहे. तो तपास न्यायालयात मांडून आरोपींना योग्य शासन करण्यासाठी वकिलांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध वकील ॲड. शिशिर हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकण येथे 20 किलो मेफेड्रोन ड्रग्ज पकडले. त्याचा धागा घेऊन पोलिसांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधून तब्बल 21 आरोपींना टप्प्याटप्प्यात अटक केली आहे.

आरोपींनी बनवलेले ड्रग्ज, वापरलेली कंपनी, झालेला आर्थिक व्यवहार, मागणी, उत्पादन आणि पुरवठा अशी मोठी साखळी उघडकीस आणली आहे. हा तपास थेट बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याची चर्चा देखील सुरु आहे.

दरम्यान, पोलिसांनी ललित पाटील नावाच्या आरोपीला नाशिक येथून अटक केली आहे. त्याच्याकडून 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तो ड्रग्ज प्रकरणात पार्टनर आणि वेगवेगळ्या लोकांना मॅनेज करण्याचे काम करत होता. ललित पाटील हा आरोपींच्या बाजूने मांडवली करत होता. हा मुख्य धागा देखील पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हाती लागला आहे. अद्याप एकही आरोपीला जमीन मंजूर झालेला नाही.

हा तपास न्यायालयापुढे योग्य पद्धतीने मांडण्यासाठी तसेच आरोपींना योग्य शासन करण्यासाठी गृह आणि विधी मंत्रालयाने विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. यामुळे आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी मदत होणार असल्याचा विश्वास पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला.

कोण आहेत शिशिर हिरे

शिशिर हिरे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झाला. त्यांनी वकिलीचे शिक्षण मुंबई येथील शासकीय लॉ कॉलेजमधून घेतले आहे. विधी क्षेत्रात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कौशल्यामुळे त्यांना 2001 साली मालेगाव दंगल आयोगावर घेण्यात आले. त्यांनी या प्रकरणात केलेल्या युक्तिवादामुळे त्यांची अधिक प्रशंसा झाली.

महाराष्ट्रातील यंगेस्ट स्पेशल कान्स्यूलर (पीपी) म्हणून ते नावाजले. 2013 मधील धुळे दंगल आयोगात देखील ते कार्यरत होते. 2013 मध्ये माझगाव, मुंबई येथे इमारत पडली. त्यातील पीडितांची बाजू हिरे यांनी भक्कमपणे मांडली. त्यांच्या कौशल्याची दखल घेत बृहन्मुंबई आयुक्तालय कार्यक्षेत्रात विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

अनेक प्रसिद्ध अंमली पदार्थांच्या प्रकरणात त्यांनी शासकीय वकील म्हणून उत्तम युक्तिवाद केला आहे. त्यांची आता चाकण ड्रग्ज प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.